LifeStyle : आपल्या जेवणात चपाती, भाकरीचा समावेश हा असतोच. चपातीमध्ये कोणतेही प्रकार जरी नसले तरी भाकरीमध्ये दोन प्रकार हमखास पाहिला मिळतात. एक म्हणजे ज्वारीची भाकरी आणि दुसरी म्हणजे बाजरीची भाकरी. या दोन्हींपैकी कोणती भाकरी चांगली असा प्रश्न जर आला तर बाजरीची भाकर उत्तम हे त्याचं पहिलं उत्तर येऊ शकतं.
बाजरीची भाकर आरोग्यदायी असते. थंडीमध्ये बाजरीची भाकर शरीराला ऊर्जा मिळण्यासाठी मदत करते. जर तुम्ही वजन कमी करण्याच्या प्रयत्नात असाल तर आहारामध्ये बाजरीच्या भाकरीचा समावेश करा. बाजरीमध्ये फायबर मुबलक प्रमाणात असतेच. बाजरीची भाकरी खाल्ल्याने बराच वेळ पोट भरल्याप्रमाणे वाटते. त्यामुळे तुम्ही जास्त खाण्यापासून दूर राहता आणि वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत होते.
इतकंच नाहीतर बाजरीमध्ये मॅग्नेशिअम आणि पोटॅशिअम मुबलक प्रमाणात असतात. जे तुमच्या शरीरासाठी उपयोगी ठरते. याच मॅग्नेशिअम आणि पोटॅशिअममुळे रक्तदाब अर्थात ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवण्याचे काम करते. हृदयासंबंधित आजारांनी त्रस्त असणाऱ्या लोकांसाठी बाजरीची भाकरी फायदेशीर ठरते. बाजरीमधील पोषक तत्त्व कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी मदत करतात.