पुणे प्राईम न्यूज : कोल्हापूर म्हणलं की डोळ्यासमोर तांबडा- पांढरा रस्सा, झणझणीत मिसळ तशीच तिथे बोलली जाणारी रांगडी भाषा लगेच डोळ्यासमोर उभी राहते. त्यापाठोपाठ येथील कोल्हापुरी चपला आपल्या डोळ्यासमोर आल्याशिवाय राहत नाही. कोल्हापुरी चप्पल भारतीय व भारताबाहेरील ग्राहकांच्या पसंतीस उतरल्या आहेत.
सण समारंभात पारंपरिक वेशभूषेचा नवा ट्रेण्ड गेल्या काही वर्षांपासून जोर धरत आहे. लग्न कार्यात एरवी शेरवानी आणि सुटाबुटाच्या प्रेमात पडणारी तरुणाई हल्ली सोवळा आणि नक्षीदार कुर्त्यांच्या पेहरावातही दिसू लागली आहे. कोल्हापुरी चप्पल आता तरुणाईलाही आकर्षित करू लागली आहे. सुबक आकार, नक्षीकाम आणि त्यांचा टिकाऊपणा ही कोल्हापुरी चपलांची वैशिष्टये आहेत.
जगाच्या बाजारात दर्जेदार चप्पलनिर्मिती क्षेत्रात आपले वेगळे अस्तित्व आणि दर्जा आजही कोल्हापुरी चपलेने टिकवून ठेवला आहे. हायहिल्स आणि फ्लॅट शूजच्या युगातही कोल्हापुरी चप्पल आपले वेगळेपण टिकवून आहे. फॅशन अॅक्सेसरीजचाच एक भाग बनलेल्या पादत्राणांचे वेगवेगळे ट्रेण्ड्स सध्या बाजारात पाहायला मिळत असले तरी पारंपरिक पादत्राणांमध्ये कोल्हापुरीला आजही मानाचे स्थान आहे. महत्त्वाचे म्हणजे या कोल्हापुरी चप्पलेने गेल्या काही वर्षांपासून मोजडीतही स्वतला सामावून घेतले आहे. त्यामुळे चप्पल आणि मोजडी वेगळी वाटेनाशी झाली आहे.
निरनिराळ्या आकारात आणि फॅशनच्या स्वरूपात उपलब्ध झाल्याने कोल्हापुरी चपलाने जगाच्या बाजारपेठेत आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. जगात दर तासाला फॅशन बदलत असतानाही गेली कित्येक वर्षे कोल्हापुरी चपलांनी मात्र फॅशन जगावर एकहाती सत्ता गाजवली आहे. त्यामुळे आजही कोल्हापुरी चपलेचे वेड कणभरही कमी झालेले नाही. पुरुषांप्रमाणेच महिला वर्गालाही या चप्पल प्रकारने भुरळ घातली आहे.