पुणे: महाराष्ट्रात गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी साजरा होणारा हरितालिका हा सण महिलांसाठी विशेष महत्त्वाचा असतो. भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीयेला साजरा होणाऱ्या या व्रतामध्ये महिला भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा करतात. या व्रतामागे एक खास कथा आणि काही विशिष्ट नियम आहेत, ज्यामुळे ते अधिक महत्त्वाचे ठरते.

हरितालिका पूजेची पद्धत

हे व्रत निर्जला (पाणी न पिता) ठेवले जाते आणि कुमारिका तसेच सौभाग्यवती स्त्रिया करतात. चांगला जोडीदार मिळावी यासाठी कुमारिका हे व्रत करतात, तर सौभाग्यवती स्त्रिया पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि सुखी संसारासाठी हे व्रत करतात.

पूजेची तयारी:
- पूजेसाठी चौरंग किंवा पाट मांडून त्यावर केळीच्या खांबांनी आकर्षक मंडप तयार केला जातो.
- त्यावर मातीचे किंवा वाळूचे शिवलिंग, माता पार्वती आणि गणपतीच्या मूर्ती तयार करून त्यांची स्थापना केली जाते.
- या मूर्तींना नवीन वस्त्रे परिधान केली जातात.
पूजा विधी:
- पूजा सुरू करण्यापूर्वी, हळद-कुंकू लावून देवाला विडा अर्पण केला जातो.
- त्यानंतर, भगवान शिव, पार्वती आणि गणपतीची षोडशोपचार पूजा केली जाते.
- यामध्ये बेलपत्र, विविध प्रकारची फुले आणि पत्री (पाने) अर्पण केली जातात.
- धूप, दीप आणि नैवेद्य दाखवून आरती केली जाते.
- रात्री जागरण करण्याची परंपरा आहे आणि या वेळी हरतालिकेची कथा ऐकली जाते.
- दुसऱ्या दिवशी, सकाळी लवकर उत्तरपूजा करून मूर्तींचे विसर्जन केले जाते.
पूजेसाठी लागणारे साहित्य
- देवतांच्या मूर्ती: मातीचे शिवलिंग, माता पार्वतीची मूर्ती मातीने बनवावी आणि गणपतीची मूर्ती
- पूजेची सामग्री: हळद, कुंकू, चंदन, अक्षता, सुपारी, विड्याची पाने, नारळ, बेलपत्र, फुले, दुर्वा.
- प्रसादासाठी: फळे, खारीक, बदाम, नारळाचा तुकडा, आणि नैवेद्यासाठी पारंपरिक पदार्थ.
- सौभाग्याच्या वस्तू: बांगड्या, गजरा, मंगळसूत्र, बिंदी अशा सोळा श्रृंगाराच्या वस्तू अर्पण केल्या जातात.
हरितालिकेची पौराणिक कथा
या व्रतामागे माता पार्वतीची कथा आहे. पार्वतीला भगवान शंकरांसोबत विवाह करायचा होता, पण त्यांच्या वडिलांनीत्यांचा विवाह भगवान विष्णूंसोबत निश्चित केला होता. हे टाळण्यासाठी पार्वतीने आपल्या सखीसह एका घनदाट जंगलात जाऊन घोर तपश्चर्या केली. तिने अन्न-पाणी सोडून केवळ पानांचे सेवन केले. तिच्या या कठोर तपामुळे भगवान शिव प्रसन्न झाले आणि त्यांनी पार्वतीशी विवाह करण्याचे वचन दिले. हे व्रत महिलांच्या कठोर तपस्या, दृढनिष्ठा आणि निस्सीम भक्तीचे प्रतीक आहे, ज्यामुळे त्यांना सुखी वैवाहिक जीवनाचा आशीर्वाद मिळतो.







