सध्या पावसाळा सुरु झाला आहे. त्यामुळे साहजिकच कपड्यांवर चिखल किंवा मातीचे काही डाग पावसाच्या थेंबासह नकळतपणे लागतातच. तेव्हा हे डाग काढण्याचा मोठा प्रश्न निर्माण होतो. अनेक महागडे डिटर्जंट पावडर वापरुनही हे डाग निघत नाहीत. जर तुम्हाला तुमच्या आवडत्या कपड्यांवरील डाग हटवायचे असतील तर तुम्ही विविध घरगुती उपाय करून पाहू शकता.
कपड्यांवर पडलेले हे डाग काढण्यासाठी गरम पाण्यात थोडी डिटर्जंट पावडर टाकून त्यात मातीने माखलेले कपडे 20 मिनिटे भिजवावेत. यामुळे कपड्यांवरून सहजपणे डाग निघून जातात. जीन्सवर डाग पडले असल्यास दहा मिनिटे ती साबण्याच्या पाण्यात भिजवावी. नंतर हाताने किंवा ब्रशने घासावे. यामुळे मातीचे डाग स्वच्छ होतील. याशिवाय, लिंबाच्या मदतीनेही आपण मातीचे डाग साफ करू शकतो. कपडे धुताना लिंबाची फोड डागावर घासल्यास डाग फिके पडतात.
तसेच कपडे धुवूनदेखील स्वच्छ होत नसतील आणि त्यावर डाग शिल्लक राहत असतील तर त्यावर लिंबू आणि मीठ एकत्र करून घासावे. यानंतर पाण्याने स्वच्छ करावेत. डाग नाहीसे होतील. पांढऱ्या कपड्यांवरील डाग काढण्यासाठी तुम्ही व्हिनेगर आणि बेकिंग सोडा वापरू शकता. यासाठी दोन्ही एकत्र करून पेस्ट बनवा. व्हिनेगरचा वापर करून हे डाग काढता येतात.