Pune Prime News : स्वादिष्ट आणि रूचकर जेवण व्हावं यासाठी गृहिणींकडून काहीना काहीतरी विशेष पर्यायांचा अवलंब केला जातो. त्यात स्वयंपाकघरात अनेकदा जेवण करताना गृहिणींना काही अडचणींना सामोरे जावे लागते. त्यात रुचकर जेवण हवं असेल तर खास टिप्स फॉलो केल्यास फायद्याचे ठरू शकते.
गुळाच्या पोळ्या करताना पिठात थोडे डाळीचे पीठ मिसळल्यास पोळी भाजताना गूळ वितळून पोळीबाहेर येत नाही व पोळ्याही खुसखुशीत होतात. पुरणपोळीचे पुरण सैल झाल्यास थोडा वेळ सूती राजापुरी पंचावर पसरून ठेवावे. लसणाची साल लवकर निघण्यासाठी लसणाच्या गड्याला थोडा गोड्या तेलाचा हात लावावा. वेलदोड्याची पूड करताना वेलदोड्याच्या दाण्याबरोबर थोडी साखर टाकावी आणि पूड बारीक होण्यासाठी बेलदोडे थोडे गरम करून घ्यावेत. मूळा किसून झाल्यावर जे पाणी सुटते ते टाकून न देता आमटीला घालावे स्वाद चांगला येतो.
मीठ मिरच्यांचा खरडा काही वेळाने काळा पडतो, त्यासाठी खरडा करतानाच थोडा लिंबू पिळावा. त्यामुळे रंग हिरवागारच राहील. पराठ्यांसाठी पीठ भिजवताना कणकेत दोन चमचे मैदा घातल्यास पराठे खुसखुशीत होतात. कोफ्त्यासाठी कच्ची केळी वापरल्यास कोफ्ते एकदम पटकन चांगले कुरकुरीत होतात आणि ते जास्त तेल पण शोषून घेत नाहीत.