निरोगी आरोग्यासाठी पोषक आहारासह व्यायामही महत्त्वाचा असतो. या व्यायामामुळे अनेक फायदे होतात. व्यायामामुळे शारीरिकसह मानसिक आरोग्यही सुधारते. व्यायाम केल्याने शरीरात एंडोर्फिन नावाचा हार्मोन निघतो, ज्यामुळे तणाव कमी होतो आणि एकाग्र होण्यास मदत होते.
सर्वप्रथम तुम्हाला व्यायाम का करायचा ते ठरवा. जसे की वजन कमी करणे, स्नायू मजबूत करणे, तंदुरुस्त राहणे किंवा एखाद्या विशेष कार्यक्रमाची तयारी करणे ही कारणं असू शकतात. व्यायामासाठी वेळेचे व्यवस्थापन महत्त्वाचे असते. व्यायामाची सवय लावण्यासाठी वेळेचे व्यवस्थापन सर्वात महत्त्वाचे आहे. यासाठी वेळेवर झोपण्याची आणि उठण्याची सवय लावा. व्यायामासाठी एक वेळ सेट करा आणि दररोज त्या वेळेत व्यायाम करा. व्यायामामध्ये एका दिवसाचेही अंतर न ठेवण्याचा प्रयत्न करा. त्यात सातत्य ठेवा.
निरोगी व्यक्तीने दररोज 30 मिनिटे किंवा आठवड्यातून किमान 150 मिनिटे व्यायाम करण्याचा सल्ला दिला जातो. पण वजन कमी करायचे असेल तर व्यायामासाठी अतिरिक्त वेळ देणे गरजेचे आहे. मात्र, व्यायाम करताना तुमची शारीरिक क्षमता लक्षात ठेवा. दररोज तासनतास व्यायाम करणे टाळा.