Dussehra: विजयादशमी हा हिंदू धर्मातील एक अत्यंत पवित्र आणि ऐतिहासिक सण आहे. नवरात्रीनंतर दसऱ्याच्या दिवशी हा सण साजरा केला जातो. या दिवशी विशेषतः शस्त्रपूजा केली जाते आणि आपट्याच्या झाडाची पानं ‘सोनं’ म्हणून एकमेकांना दिली जातात. ही परंपरा हजारो वर्षांपासून चालत आली असली, तरी यामागचं ऐतिहासिक आणि पौराणिक कारण अनेकांना ज्ञात नसतं.

रामायणातील कथेप्रमाणे, विजयादशमीच्या दिवशी प्रभू श्रीरामांनी रावणाचा वध करून धर्माचा विजय साजरा केला गेला. त्याचप्रमाणे, रघुवंशातील एक गोष्ट आपट्याच्या पानांना ‘सोन्याचं’ स्थान का दिलं जातं, यातून स्पष्टीकरण समोर येतं.

काय आहे कथा?
कथेनुसार, पैठण नगरीत देवदत्त नावाच्या ब्राह्मणाचा कौत्स नावाचा मुलगा होता. मौजीबंधनानंतर तो शिक्षणासाठी भडोच ऋषींच्या आश्रमात गेला. काही काळातच तो सर्व शास्त्रांमध्ये निपुण झाला. त्यानंतर जेंव्हा त्याचे शिक्षण पूर्ण झाले. तेंव्हा कौत्साने गुरूला गुरूदक्षिणा देण्याचा आग्रह धरला. ऋषींनी सुरुवातीला त्याला दक्षिनेबाबत नकार दिला, पण कौत्सच्या हट्टामुळे त्यांनी प्रत्येक विद्येसाठी एक कोटी, अशा चौदा कोटी सुवर्णमुद्रांची मागणी केली होती.

गुरूदक्षिणेसाठी कौत्स थेट अयोध्येतील रघुराजाकडे गेला. मात्र रघुराजाने त्या वेळेस विश्वजित यज्ञ करून आपली सर्व संपत्ती दान केली होती. तरीही कौत्साला मदत करण्यासाठी ते सज्ज झाले. हे कळताच इंद्राने कुबेराला आज्ञा दिली आणि अयोध्येच्या बाहेर असलेल्या आपट्याच्या झाडांवर सुवर्णमुद्रांचा वर्षाव केला.
या सुवर्णमुद्रांचा ढीग रघुराजाने कौत्साला दिला. कौत्साने गुरूला 14 कोटी मुद्रा दिल्यावर उरलेल्या मुद्रा परत रघुराजाकडे नेल्या. मात्र रघुराजाने त्या स्वीकारण्यास नकार दिला. अखेरीस त्या आपट्याच्या व शमीच्या झाडाखाली ठेवून लोकांना नेण्यास सांगितलं.
नगरातील लोकांनी या सुवर्णमुद्रांचं ‘लुट’ रूपात स्वागत केलं. त्या झाडांची पूजा करून, सोनं म्हणून ते एकमेकांना देत आनंद साजरा केला. हा दिवस विजयादशमीचाच होता.
त्यानंतर आजवर, या परंपरेचं प्रतीक म्हणून आपट्याची पानं सोनं मानली जातात आणि दसऱ्याच्या दिवशी एकमेकांना दिली जातात.







