Kokum Juice Benefits : सध्या उन्हाचा चांगलाच कडाका जाणवत आहे. त्यामुळे यापासून वाचण्यासाठी काहीना काही उपाय केले जात आहेत. असे असताना थंड पेयांना सर्वाधिक प्राधान्य दिले जाते. त्यात कृत्रिम पेयांपेक्षा नैसर्गिकरित्या बनवलेल्या पेयांना पसंती दिली जाते. त्यापैकी एक म्हणजे कोकम सरबत.
कोणत्याही कृत्रिमरीत्या थंडगार शीतपेयांपेक्षा कोकम सरबताचे गुण आणि फायदे निश्चितच जास्त आहेत. शरीरात नियमित पद्धतीने पित्त निर्माण होते आणि त्याचा चयापचय या शरीरांतर्गत व्यवहाराशी संबंध येतो. खाण्यापिण्याच्या नको त्या सवयी, तेलकट, मांसाहारी पदार्थ, मसालेदार पदार्थ, जास्त खाणे किंवा अनेक अनियमित पद्धती यांमुळे पित्ताची अतिरिक्त निर्मिती होते. मात्र, याच पित्त विकारावर अतिशय गुणकारी असे औषधी फळ आहे ते म्हणजे कोकणातील रातांबा ऊर्फ कोकम.
नियमित कोकम सरबताचे सेवन केल्यास पित्त विकार दूर होण्यास मदत होते. रातांब्यापासून बनवलेले कोकम सरबत हे गुणांनी आणि चवीनेही अतिशय मधुर असते. सध्याच्या उष्णतेच्या दिवसांमध्ये हे सरबत जरूर प्यावे. पित्त विकाराने ग्रस्त असणाऱ्या रुग्णांसाठी कोकम आणि कोकमापासून बनवलेली उत्पादने फायदेशीर आहेत. तसेच कोकमच्या बियांपासून बनवलेल्या तेलाचाही वापर डोळ्यांची आणि तळपायांची जळजळ कमी करण्यासाठी फायदेशीर ठरू शकते.