आज आंतरराष्ट्रीय योगा दिन साजरा करण्यात आला. यामध्ये अनेक शाळा, महाविद्यालये इतकेच नाहीतर काही ऑफिसमध्येही योगासने करण्यात आली. पण योगा करताना काही गोष्टींची माहिती असणे गरजेचे आहे. काहींना माहिती असेल तर काहींना कल्पनाही नसेल. त्यामुळेच आम्ही तुम्हाला याची माहिती देत आहोत.
योगाभ्यास करण्याची योग्य वेळ ही पहाटे 4 ते 7 वाजता असते. जर सकाळी योगाभ्यास करणे शक्य नसेल तर सायंकाळीही सराव करू शकता. योगासने कधीही करा पण जेवण केल्याच्या चार तासांनंतर योगाभ्यास करावा. योगाभ्यास करताना नेहमी सैल कपडे परिधान करावे. यामुळे योगासनांचा अभ्यास करताना कपड्यांमुळे कोणतीही अडचण निर्माण होणार नाही. सूती कपडे असल्यास फारच उत्तम.
योगाभ्यास करताना कधीही शरीरासोबत जबरदस्ती करू नये. कारण असे करून तुम्ही तुमच्या शरीराच्या मसल्स आणि नसांवर उगाच ताण देत असता, जे फारच घातक ठरू शकते. योगाभ्यास करताना जेवढे शक्य असेल तेवढच वाका किंवा हाता-पायांना ताणा. योगाभ्यासाची सुरुवात वॉर्मअपने करावी. प्रत्येक आसने करताना मधल्या वेळेत काही मिनिटांची विश्रांती घ्यावी.
स्वतःच्या क्षमतेनुसार आसनांची अंतिम स्थिती धारण करावी व सरावानुसार आवर्तने आणि अंतिम स्थिती टिकवण्याची वेळ वाढवावीत. जेवण आणि योगाभ्यास यात कमीत कमी 3 तासांचे अंतर असणे फार गरजेचे आहे. तसेच अनेकदा योगाभ्यास करताना लोक मधेच पाणी पितात, असे अजिबात करू नये. या सर्व गोष्टींची काळजी घेतल्यास नक्कीच फायद्याचे ठरू शकते.