सध्या बहुतांश गोष्टी ऑनलाईन केल्या जातात. मग खरेदी-विक्री असो किंवा ट्यूशन-क्लास. इतकेच नाहीतर वैद्यकीय सल्ला देखील ऑनलाईन दिला जातो. त्यात खरेदी करताना विशेष काळजी घ्यावी लागते. कारण, यात व्यवहार होत असतो. त्यामुळे आर्थिक फसवणूक होण्याची शक्यताही जास्त असते.
ऑनलाईन खरेदी करताना किंवा OLX सारख्या अॅप्सवरून जुन्या वस्तूंची खरेदी किंवा विक्री करताना त्या वस्तूंची जाहिरात किंवा चाचणी करणाऱ्या व्यक्तीची संपूर्ण माहिती मिळाल्यानंतरच ऑनलाईन पेमेंट करण्याचा सल्ला दिला जातो. जुनी वाहने किंवा मोबाईल स्वस्तात विकण्याचे आमिष दाखवून त्यांचा विश्वास जिंकण्यासाठी व्हॉट्सअॅपवरून व्यक्तीचे ओळखपत्र पाठवून ऑनलाईन पेमेंट करून फसवणुकीची अनेक प्रकरणे समोर येत आहेत. त्यामुळे याकडेही लक्ष द्यावे.
ऑनलाईन खरेदी ही शक्यतो विश्वासार्ह वेबसाईटवरून करावी. प्रसिद्ध वेबसाईट्स दर्जेदार सुरक्षा प्रणाली पुरवतात. सामान्यत: केवळ व्हेरिफाईड विक्रेत्यांशी व्यवहार करतात. ऑनलाईन फसवणुकीच्या प्रकारात गुन्हेगार तुमच्या इनबॉक्समध्ये एखादी लिंक पाठवून तुम्हाला आमिष दाखवत असतात. याला फिशिंग म्हणतात. लिंक तुम्हाला एका बनावट वेबसाईटवर घेऊन जाऊ शकते. ज्याचे डिझाइन सामान्य शॉपिंग पोर्टलसारखे असते. त्यामुळे ई-मेलवर आलेल्या हायपरलिंकवर क्लिक करणे टाळायला हवे.
ऑनलाईन खरेदीसाठी डेबिट किंवा क्रेडिट कार्ड वापरत असल्यास तर दर तीन महिन्यांनी तुमचा पिन क्रमांक बदलायला हवा. डिजिटल वॉलेटसाठीही हेच करावे. याशिवाय वेगवेगळे यूजर आयडी वापरा. यामुळे डेटा चोरी आणि फसवणूक होण्याची शक्यता कमी असते.