चहाची वेळ नसते पण वेळेवर चहा लागतो असे अनेकजण म्हणतात. चहा पिणारे अनेक शौकिन, चहाप्रेमी आहेत. आपल्यापैकी बहुतेकजण चहा बनवल्यानंतर उरलेली पाने अर्थात चहा पावडर निरुपयोगी मानून फेकून देतात. मात्र, तुम्हीदेखील असं करत असाल तर ते थांबवा. कारण चहा बनवल्यानंतर उरलेली पाने अनेक घरगुती कामांमध्ये वापरली जाऊ शकतात.
चहा बनवून झालेली पावडर वनस्पतींसाठी खतासमान ठरते. उरलेली चहाची पाने झाडांसाठी खत म्हणून काम करू शकतात. त्यांना वाळवल्यास किंवा थेट जमिनीत मिसळल्यास फायद्याचे ठरू शकते. त्यामुळे जमिनीची सुपीकता वाढते आणि वनस्पतींना नैसर्गिक पोषण मिळते. चहाची पाने फेस स्क्रब म्हणून वापरता येतात. यासाठी उरलेल्या पानांमध्ये थोडे मध मिसळून चेहऱ्याला लावा. हे स्क्रब त्वचेच्या मृत पेशी काढून टाकते आणि त्वचा उजळते.
याशिवाय, चहाची पाने किचन स्वच्छ करण्यासाठी खूप प्रभावी आहेत. भांडी घासण्यासाठीही याचा वापर होऊ शकतो. चहाच्या पानांचे उकळलेले पाणी केसांसाठी नैसर्गिक कंडिशनरचे काम करते. अशा स्थितीत उरलेल्या पानांवर मेहंदी आणि अंडी मिसळा आणि अर्ध्या तासानंतर धुवा. यामुळे केस मऊ आणि चमकदार होतात.