पुणे: दिवाळी (Diwali2025) उत्सवात लक्ष्मीपूजन (LaxmiPuja) हा सर्वात महत्त्वाचा दिवस मानला जातो. या दिवशी घरात समृद्धी आणि शांती नांदावी, यासाठी आदल्या दिवशी काही पूर्व तयारी करून ठेवणे आवश्यक आहे. ही सोपी तयारी सणाचा आनंद द्विगुणित करते आणि पूजा वेळेत सुरळीत पार पडते.

1. घराची विशेष स्वच्छता
लक्ष्मी पूजनाच्या दिवशी देवी लक्ष्मी घरात प्रवेश करते, अशी प्राचीन मान्यता आहे. त्यामुळे प्रवेशद्वार, देवघर आणि घरातील सर्व कोपरे नीट स्वच्छ करून घ्यावीत. जाळ्या (Cobbwebs) साफ करणे, तुटलेल्या किंवा न वापरल्या जाणाऱ्या वस्तू बाहेर काढणे गरजेचे आहे. केरसुणीसुद्धा स्वच्छ ठेवावी.

2. पूजेचे साहित्य संकलन
हळद, कुंकू, चंदन, अक्षता, सुपारी, लवंग, विड्याची पाने, अत्तर, कापूर, धूप, अगरबत्ती, तूप आणि पंचामृत (दूध, दही, तूप, मध, साखर) यासारखे साहित्य आदल्या दिवशी तयार ठेवावे. फळे, मिठाई आणि नैवेद्य (लाह्या, बत्तासे) देखील वेळेत तयार करणे गरजेचे आहे.

3. पूजेची जागा निश्चित करणे
पूजा करण्यासाठी पाट किंवा चौरंग स्वच्छ करून अंथरायचे लाल वस्त्र ठेवावे. कलश, नारळ, आंब्याचे डहाळे आणि लक्ष्मी-गणपतीच्या मूर्ती किंवा फोटो एका ठिकाणी व्यवस्थित ठेवावेत.
4. धन आणि व्यवसायाच्या वस्तूंची स्वच्छता
लक्ष्मी पूजनात घरातील धन आणि व्यवसायाच्या वस्तूंची पूजा केली जाते. त्यामुळे सोने-चांदीचे दागिने, चलनी नोटा, नाणी आणि व्यवसायाची कागदपत्रे, नवीन खातेवही (चोपडा) स्वच्छ करून तयार ठेवावीत.
5. रांगोळी आणि दिव्यांची तयारी
प्रवेशद्वारावर आकर्षक रांगोळी काढावी. पूजेसाठी लागणारे पणती (Divas) किंवा दिवे स्वच्छ करून वात (Cotton Wicks) आणि तेल (Oil/Ghee) भरून ठेवावेत. यामुळे मुहूर्ताच्या वेळी त्वरित दिवे लावता येतील. या पूर्वतयारीमुळे लक्ष्मीपूजन सुरळीत आणि शांत वातावरणात पार पडते, घरात समृद्धी आणि आनंदही नांदेल.







