तुमचं देखील बैठ काम असेल आणि तासानतास एकाच जागेवर बसावं लागत असेल तर काळजी घ्या. कारण, सातत्याने अशाप्रकारे एकाच जागेवर बसून पाठदुखीची समस्या उद्भवू शकते. यापूर्वी लोकांना वयाच्या साठीनंतर पाठदुखी किंवा कंबरदुखीचा त्रास होत असायचा मात्र आता तिशीमध्येच अनेकांना पाठदुखीचा त्रास होत असल्याचे दिसत आहेत. पण या पाठदुखीवर काही योगासने फायदेशीर ठरत आहेत.
शलभासन हा एक योगासनाचा प्रकार लाभकारक ठरू शकतो. कारण, यातून पाठदुखीच्या समस्यांपासून आराम मिळवता येऊ शकतो. नियमित शलभासन केल्याने पाठदुखीची समस्या कमी होऊन पाठीमधील वेदना कमी होतात. हे आसन करताना पोटावर झोपून दोन्ही तळवे मांड्यांच्या खाली ठेवा. त्यानंतर हळूहळू पाय वर करून वरच्या दिशेने पाय घेऊन दीर्घ श्वास घ्या. 2-5 सेकंद या स्थितीमध्ये राहिल्यानंतर सामान्य स्थितीमध्ये यावे. असे केल्यास पाठीवरील अतिरिक्त ताण कमी करता येऊ शकतो.
सध्याच्या धावपळीच्या जीवनात खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी, अपुरी झोप, आहारात व्हिटॅमिनची कमतरता यांसारख्या गोष्टींचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. पाठदुखी झाल्यानंतर चालताना किंवा खाली बसल्यावर उठताना अनेक वेदनांना सामोरे जावे लागते. त्यामुळे त्यावर उष्ट्रासन हा एक उपाय ठरू शकतो.
हे योगासन करताना गुडघ्यांवर बसून दोन्ही गुडघ्यांची रुंदी खांद्या इतकी ठेवा. त्यानंतर तळवे आकाशाकडे वर करून पाठीचा कणा पाठीमागे वाकवताना दोन्ही हातांनी टाचांना स्पर्श करा. या स्थितीमध्ये मानेवर जास्त दाब देऊ नका. कंबरेपासून गुडघ्यापर्यंतचा भाग सरळ सरळ राहिल्यानंतर 1 ते 2 सेकंद या स्थितीमध्ये राहून नंतर समस्या स्थितीमध्ये यावे. याने तुम्हाला फायदा होऊ शकतो.