पुणे प्राईम न्यूज डेस्क : मजबूत आणि घनदाट केस मिळवण्यासाठी नारळाचे पाणी केसांमध्ये लावून मसाज करा, हे तुमच्यासाठी नवीन असेल. पण, केसांसाठी नारळाच्या पाण्याचा योग्य पद्धतीने उपयोग केल्यास केसांना भरपूर लाभ मिळतील. मसाज केल्याने यातील पोषणतत्त्व सहजरित्या केसांच्या मुळांपर्यंत पोहोचतील. नारळाचे पाणी चिकट नसल्याने केसांचा गुंतादेखील होत नाही.
कोणत्याही तेलाच्या तुलनेत नारळाचे पाणी अतिशय हलके असते. याच नैसर्गिक गुणधर्मामुळे यातील पोषणतत्त्व केसांच्या मुळांपर्यंत सहजरित्या पोहोचतात. यामुळे टाळूची त्वचा अधिक मऊ आणि स्वच्छ होते. सोबतच केसांना मोठ्या प्रमाणात खोलवर पोषणतत्त्वांचा पुरवठादेखील होतो. केसांमध्ये नारळाचे पाणी लावण्यासाठी आपण ताज्या नारळाचा उपयोग करावा. नारळ फोडून त्यातील पाणी एका वाटीमध्ये काढावे. केसांना लावण्यासाठी केवळ पाच ते सहा चमचे नारळाचे पाणी दुसऱ्या वाटीमध्ये घ्यावे.
नारळाच्या पाण्यामध्ये खनिज, व्हिटॅमिन, लोह, पोटॅशिअम आणि मॅग्नेशियम यासारख्या पोषणतत्त्वांचा समावेश आहे. हे सर्व घटक आपल्या केस आणि शरीरासाठी पोषक आहेत. नारळाचे पाणी केसांच्या मुळांना लावल्याने याचे पूर्ण लाभ केसांना मिळतात. नारळ पाण्यामध्ये व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन केदेखील असतात.
नारळ पाणी आरोग्यासाठीही फायदेशीर
नारळ पाणी केसांना लावण्याव्यतिरिक्त ते प्यायल्यानेही आरोग्याला भरपूर लाभ मिळतील. यामुळे पचनप्रक्रिया सुरळीत सुरू राहून तुमचे केस आणि त्वचा अधिक सुंदर होतील. एकूण नारळाचे पाणी प्या किंवा केसांना लावा, दोन्ही प्रकारच्या उपायामुळे केसांना लाभ मिळतील.