LifeStyle : जीवन जगताना आनंदी राहणं गरजेचे असते. हा आनंद कोणत्या ना कोणत्या माध्यमातून मिळवता येतोच. पण अनेकांना दुसऱ्यांच्या आनंदात स्वतःचा आनंद मिळतो. त्यासाठी अशा व्यक्ती काहीही करण्यास तयार असतात. त्यातून आपल्यालाही समाधान मिळते.
काही जण तर दुसऱ्यांना मदत करण्यातच प्राधान्य देतात. तर दुसरीकडे काही जणांना समोरच्याला नाही म्हणता येत नसल्यानेही ते दुसऱ्यांची कामे त्यांना आनंद मिळावा म्हणून करत राहतात. अशावेळी या व्यक्ती स्वतःचा आनंद विसरुनच जातात आणि तणावात जगतात. जे पूर्णत: चुकीचे आहे. यामुळे दुसऱ्यांना आनंद देताना तुमच्या मनाची, भावनांची काळजी घेणेही तेवढेच आवश्यक आहे हे वेळीच समजायला हवे. त्यासाठी काय करावे ते समजून घ्यायला हवे.
तुम्ही तुमचे प्राधान्यक्रम चांगल्याप्रकारे समजून घेतले पाहिजेत. इतरांच्या आधी स्वतःचाही विचार करा. तुमच्या गरजा, उद्दिष्टे आणि कल्याण यांना प्राधान्य द्या. याचा अर्थ असा नाही की तुम्ही स्वार्थी आहात, स्वतःला मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या मजबूत ठेवून तुम्ही इतरांना चांगल्याप्रकारे मदत करू शकता.
इतरांना वाईट वाटू नये म्हणून ते प्रत्येक गोष्टीला हो म्हणतात, पण नाही म्हणायला शिकले पाहिजे, तरच तुम्ही या सवयीतून बाहेर पडाल. हे तुमच्यासाठी सुरुवातीला कठीण जाईल आणि तुम्हाला तुमच्या मानसिक आरोग्याचा विचार करणे आवश्यक आहे.