पती-पत्नीचे नाते हे प्रेमाचे, विश्वासाचे असते. त्यामुळे हे नाते टिकवणे गरजेचे असते. पती-पत्नीमधील नाते दृढ करण्यासाठी लग्नाचा सुरुवातीचा काळ हा सर्वात महत्त्वाचा काळ असतो. यादरम्यान पती असो वा पत्नी आपल्या जोडीदाराची विशेष काळजी घेण्याचे आव्हान समोर येते. पण, अशा काही गोष्टी आहेत त्याकडे लक्ष दिल्यास नक्कीच फायद्याचे ठरू शकते.
लग्नानंतर तुमच्या जोडीदाराची तुलना इतर कोणत्याही नात्याशी किंवा व्यक्तीशी करणे टाळा. अशा तुलनेने दोघांमध्ये नकारात्मकता निर्माण होऊन जोडीदाराच्या मनात न्यूनगंड निर्माण होऊ शकतो. अशा गोष्टींमुळे नाते कमकुवत होऊ शकते, त्यामुळे तुमच्या जोडीदाराचे गुण स्वीकारा. याशिवाय, अनेकवेळा लोक इतरांच्या बोलण्याने प्रभावित होतात आणि आपल्या जोडीदाराबद्दल गैरसमज निर्माण करतात. लग्नाच्या सुरुवातीच्या काळात जोडीदारावर विश्वास ठेवणे खूप महत्वाचे असते. गैरसमज टाळण्यासाठी, इतरांचे ऐकण्यापूर्वी स्वतः परिस्थिती समजून घ्या.
नात्यात दोघांची मते महत्त्वाची असतात. लग्नाच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये तुमच्या मताला जास्त महत्त्व देणे आणि जोडीदाराचे न ऐकणे यामुळे नात्यात तणाव निर्माण होऊ शकतो. आपल्या जोडीदाराचे ऐकणे आणि त्याचे विचार समजून घेणे हे चांगल्या जोडीदाराचे कर्तव्य आहे. त्यामुळे या गोष्टींकडेही लक्ष द्यावे.