माढा : महाराष्ट्रात मंगळवार सात मे रोजी लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान सुरु आहे. अशातच एका मतदाराने थेट ईव्हीएम मशीन पेटवण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. त्यानंतर मतदान केंद्रावरील अधिकाऱ्यांनी तरुणाला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यामध्ये बादलवाडी येथे ही घटना घडली आहे.
बादलवाडीमध्ये एका तरुणाने मतदान करताना ईव्हीएम पेटवण्याचा प्रयत्न केल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. मतदान केंद्रावरील संबंधित अधिकाऱ्यांनी या तरुणाला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. मात्र, ईव्हीएम पेटवण्यामागचे नेमके कारण हे अद्याप समोर आलेले नाही. माढा मतदारसंघात येणाऱ्या सांगोला तालुक्यातील बादलवाडी येथील मतदान केंद्रावर दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. यामध्ये दोन ईव्हीएम आणि सोबत असलेले बॅलेट हे तांत्रिक साहित्य जळाले आहे.