शिरुर : कौटुंबीक वादातून बैलगाडा शर्यतीदरम्यान तुफान हाणामारी झाल्याची धक्कादायक घटना मलठण (ता.शिरूर) येथे नुकतीच घडली आहे. या हाणामारीमध्ये एक तरुण गंभीर जखमी झाला असल्याची माहिती समोर येत आहे. तर या घटनेचा धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मलठण येथील शिंदेवाडीमध्ये आज रविवारी (ता.२८) यात्रा आहे. यात्रेनिमित्ताने गावामध्ये बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले आहे. बैलगाडा शर्यत पाहण्यासाठी संपूर्ण गाव आले होते. या शर्यतीमध्येच दोन गटामध्ये तुफान हाणामारी झाली. दोन कुटुंबातील हा वाद आहे. बैलगाडा शर्यतीदरम्यान दोन्ही कुटुंबातील काही सदस्य आमने-सामने होते.
या मारहाणीमध्ये तरुण गंभीर जखमी झाला आहे. जखमी तरुणाला तात्काळ नजीकच्या खासगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. या तरुणाची प्रकृती चिंताजनक आहे. हाणामारी करणारी ही दोन्ही कुटुंब शिंदेवाडी येथीलच आहेत. या दोन्ही कुटुंबातील भांडणाचे कारण अद्याप समोर आले नाही.
दरम्यान, ठिकाणी ही हाणामारी सुरू असताना देखील एकही व्यक्ती त्यांच्यातील वाद सोडवण्यासाठी आला नाही. एका तरुणाला काठीने जीव जाईपर्यंत दुसरा तरुण मारत असताना देखील घटनास्थळी सर्वजण बघ्याच्या भूमिकेत होते. अनेक जण मोबाईलमध्ये ही घटना कैद करण्यामध्ये व्यस्त होते.