पुणे : पेट्रोल चोरल्याच्या संशयावरून वीस वर्षीय तरुणाला बेदम मारहाण केल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. या प्रकरणात नऱ्हेगावाचे माजी उपसरपंच सुशांत सुरेश कुटे (रा. चैतन्य बंगला, मानाजीनगर, नऱ्हे) याचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे. सत्र न्यायाधीश पी. पी. जाधव यांनी हा आदेश दिला आहे. समर्थ नेताजी भगत (वय २०, रा. नन्हे) असे मृत झालेल्या तरुणाचे नाव आहे.
याप्रकरणी नेताजी सोपान भगत यांनी सिंहगड रस्ता पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सिंहगड रस्ता परिसरातील नऱ्हे येथील मानाजीनगर भागात २५ नोव्हेंबर पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास कुटे यांच्या ऑफिससमोर हा प्रकार घडला होता. समर्थ हा त्याच्या गाडीतील पेट्रोल संपल्याने तो दुसऱ्या गाडीतून पेट्रोल काढत असल्याच्या संशयावरून आरोपी गौरव संजय कुटे व त्याच्या इतर दोन ते तीन साथीदारांनी त्याला लाथाबुक्यांनी, काठीने मारहाण करून गंभीर जखमी केले. यामध्ये त्याचा मृत्यू झाला होता.
याप्रकरणात, अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी कुटे याने न्यायालयात अर्ज केला होता. त्यास सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील प्रमोद बोंबटकर यांनी विरोध केला. गुन्हा झाल्यापासून सुशांत कुटे फरार आहे. प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांच्या जबाबामध्ये त्याचे नाव आलेले आहे. गुन्ह्याच्या तपासासाठी त्याला अटक करणे गरेजेचे आहे. त्यामुळे जामीन फेटाळण्यात यावा, असा युक्तिवाद अॅड. बोबटकर यांनी केला. न्यायालयाने बचावपक्षासह सरकार पक्षाचा युक्तिवाद ऐकून घेत जामीन अर्ज फेटाळला आहे.