उरुळी कांचन, (पुणे): पूर्व हवेलीसह परिसरात दुचाकी वाहनांच्या संख्येत वाढ झाली आहे. यातही ‘बुलेट’ची क्रेझ तरुणाईला भुरळ घालणारी ठरली आहे. मात्र, याच बुलेटस्वारांच्या सायलेन्सरमधून निघणाऱ्या ‘फटाका’सदृश आवाजांमुळे उरुळी कांचन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नागरिक पुरते त्रस्त झाले आहेत. मागील काही दिवसांपासून वाढीस लागलेल्या या गैरप्रकाराला आळा घालण्यास उरुळी कांचन पोलिस मात्र सपशेल अपयशी ठरत आहेत.
सध्या बुलेटची तरुणाईत मोठी क्रेझ आहे. दुचाकी वाहनांत अधिक किंमत असूनही ‘बुलेट’ची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे. मात्र, काही युवकांनी याच नियमांना खो देत जणू उच्छाद मांडला आहे. अनेक दिवसांपासून असे फटाके वाजविणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. फटाकेसदृश आवाज काढणाऱ्या ‘बुलेट’स्वारांसह फॅन्सी नंबर प्लेट असलेल्या वाहनधारकांवर ठिकठिकाणी नाकाबंदी करून उरुळी कांचन पोलिसांनी तत्काळ कारवाई करावी अशी मागणी नागरिक करू लागले आहेत.

फटाका आवाज काढल्याने घरात असलेला मित्र आवाजाने घरातून बाहेर पडतो व दोघेजण मिळून आवाज काढत महाविद्यालयाकडे रवाना होतात. अशा या रोजच्या आवाजाला नागरिक कंटाळले असून पोलिसांनी या बुलेट राजांवर सपशेल दुर्लक्ष केले आहे. विशेषतः रस्त्याने जाणारे ज्येष्ठ नागरिक, लहान मुले व महिला आवाजामुळे भयभीत होतात. यातून अपघातांची शक्यताही बळावत असून अशा बुलेटस्वारांसह त्यांच्या पालकांवर कारवाई करण्याची मागणी परिसरातून केली जात आहे.
महामार्गावर, शाळेच्या परिसरात सर्वात पुढे वेगात जाऊन फटाका वाजवणे, गल्ली बोळातून भरधाव वेगात जाताना मध्येच फटाका वाजवणे यामुळे अनेक दुचाकीस्वार गडबडतात. तर बहुतांश दुचाकीवरील वृद्ध, बालके घाबरुन जात असल्याचे चित्र सध्या परिसरात आहे. शाळा-महाविद्यालये, दवाखाने, या परिसरात ‘बुलेट’स्वारांकडून ‘शाईनिंग’च्या नादात मर्यादा ओलांडली जात आहे. या युवकांकडून ‘बुलेट’च्या सायलेन्सरमध्ये अवैधरीत्या बदल करत तो आवाज फटाक्यांसारखा घुमेल अशी व्यवस्था केली जात आहे. यामुळे बेभानपणे रस्त्याने जाणाऱ्या या बुलेटस्वारांकडून भर गर्दीत ‘फटाका’सदृश आवाज काढून नागरिकांमध्ये दहशत बसविण्याचा प्रकार केला जात आहे.
या ठिकाणी प्रमाण जास्त
उरुळी कांचन येथील स्वामी विद्यामंदिर परिसर, आश्रम रोड, महात्मा गांधी शाळेच्या बाजूला असलेल्या रस्त्यावर, तुपेवस्तीकडे जाणाऱ्या मार्गावर, तुपेवस्तीत सकाळी 7 ते 8 व सायंकाळी साडे सहा ते रात्री उशिरापर्यंत काही तरूण बुलेटवर फटाका आवाज काढत धूम स्टाईलमध्ये फिरत आहेत.
यापूर्वी झाल्या बुलेटस्वारांवर कारवाया
कर्णकर्कश सायलेन्सर लावणाऱ्या बुलेटस्वारांवर यापूर्वी उरुळी कांचन पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर बाजगिरे यांनी व त्यांच्या पथकाने बेधडक कारवाई केली होती. यामुळे थोडा लगाम बसला होता. परंतु, आता पुन्हा येरे माझ्या मागल्या झाले आहे. त्यानंतर अलिकडच्या काळात कारवाई थंडावली आहे. व पुन्हा परिसरात फटाका आवाज वाढला आहे.
याबाबत बोलताना उरुळी कांचन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर पाटील म्हणाले , “उरुळी कांचन पोलीस ठाण्याच्या हद्दीत कारवाई सुरु असून आताही प्रभावी कारवाई करण्यात येत आहे. ज्या बुलेटला असे सायलेन्सर लावण्यात आले आहेत, त्या चालकांनी आपले सायलेन्सर कढून ठेवावे. अन्यथा त्या चालकाचे लायसन्स निलंबित करण्यासाठी आरटीओला कागदपत्रांची पूर्तता करण्यात येईल.”







