वाळूज महानगर (छत्रपती संभाजीनगर): एकलहेरा गावात गाय अंगावर धावली म्हणून चिडलेल्या तरुणाने गायीसह तरुणाला लाकडी दांड्याने केलेल्या मारहाणीत जखमी झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान रविवारी (दि.९) मृत्यू झाला. ओंकार उत्तम जाधव (१९ रा. एकलहेरा, जि. छत्रपती संभाजीनगर) ओंकार जाधव असे मृत झालेल्या तरुणाचे नाव आहे. विरू पवार (रा. एकलहेरा) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
शुभम जाधव यांची एकलहेरा शिवारात १ एकर १३ गुंठे जमीन आहे, तर बाजूलाच त्याचा चुलत भाऊ ओंकार उत्तम जाधव यांची सुध्दा जमीन आहे. दरम्यान ७ जून रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास शुभम हा त्याच्या शेतात शेळ्या चारत होता. तर त्याचा चुलत भाऊ ओंकार हा गायीला पाणी पाजण्यासाठी घेऊन जात असताना, रस्त्यात उभा असलेला विरू पवार यांच्या अंगावर गाय धावून गेली.
त्यामुळे विरू याने गायीला लाकडी दांड्याने मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यावेळी ओंकार याने विरूला गायीला मारू नका, असे म्हणला असता त्यास शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यावेळी त्याने विरू यास ‘आम्ही तुम्हाला आमच्या शेतात राहण्यासाठी जागा दिली आहे. तुम्ही येथून निघून जा’ असे म्हणताच विरू चिडला आणि त्याने ओंकारच्या डोक्यात लाकडी दांड्याने मारहाण केल्याने तो गंभीर जखमी होऊन खाली पडला. त्यानंतर त्याचा चुलत भाऊ शुभम याने ओंकार यास घाटी रुग्णालयात दाखल केले. त्याच्यावर उपचार सुरू असताना रविवारी (दि.९) प्राणज्योत मालवली.
या प्रकरणी शुभम जाधव याने दिलेल्या तक्रारी वरून आरोपी विरू पवार याच्या विरूध्द एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोउपनि. प्रवीण पाथरकर करीत आहे.