पुणे : रेल्वेचे कन्फर्म तिकीट मिळाल्याचा बोगस मेसेज देऊन प्रवाशांची आर्थिक फसवणूक करण्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी गोटखिंडीतल्या भामट्याला पुण्यात अटक करण्यात आले आहे. प्रवीणकुमार मधुकर लोंढे (रा. गोटखिंडी, ता. वाळवा) असे आरोपीचे नाव आहे. रेल्वे सुरक्षा दलाने सोमवारी पुणे रेल्वे स्थानकावर ही कारवाई केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, रेल्वेच्या कन्फर्म तिकिटासाठी प्रवाशांची धडपड सुरू असते. अशा प्रवाशांना हेरून लोंढे अधिकाऱ्यांमार्फत कन्फर्म तिकीट देण्याचा बहाणा करायचा. प्रवाशाची माहिती व मोबाईल क्रमांक घेऊन त्यांना कन्फर्म तिकिटाचा बोगस मेसेज मोबाईलवर पाठवायचा. त्यासाठी तो प्रवाशांकडून पैसे उकळायचा. प्रत्यक्षात एकाच आसनाची दोन कन्फर्म तिकीट झाल्याने नंतर प्रवाशांत भांडणे होत होती.
मात्र, तोपर्यंत लोंढे गायब झालेला असायचा. जम्मू-झेलम तावी एक्स्प्रेसमध्ये असाच प्रकार घडला. ही बाब तिकीट तपासनीस जी. एस. राजापुरे यांच्या निदर्शनास आली. त्यांनी रेल्वे प्रशासनाकडे तक्रार केली. तपासासाठी सायबर सेलच्या तज्ज्ञांचे पथक तयार करण्यात आले. बोगस मेसेज पाठविलेल्या मोबाईल क्रमांकाच्या आधारे प्रवीणकुमारला पथकाने पकडले.