लोणी काळभोर : क्लासवरून घरी चाललेल्या एका दहावीच्या विद्यार्थिनीची छेड काढून विनयभंगासह अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना लोणी काळभोर परिसरात रविवारी (ता.5) दुपारी चार वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या गुन्ह्यातील आरोपींना लोणी काळभोर पोलिसांनी अवघ्या एक तासाच्या आत मोठ्या शिताफीने बेड्या ठोकल्या आहेत. लोणी काळभोर पोलिसांच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
युवराज सोमनाथ सोनवणे (वय 25 रा.धुमाळ मळा, लोणी काळभोर, ता. हवेली) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी 16 वर्षीय पिडीतेच्या आईने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तर या अगोदरही आरोपीच्या विरोधात भरतीय न्याय दंड संहिता कलम 363 अन्वये गुन्हा दाखल आहे.
लोणी काळभोर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिडीत विद्यार्थिनी ही लोणी काळभोर परिसरातील एका नामांकित शाळेत इयत्ता दहावीच्या वर्गात शिक्षण घेत आहे. तसेच ती लोणी काळभोर परिसरात एका खाजगी क्लास मध्ये शिकवणीसाठी जाते. दरम्यान, पिडीता ही नेहमीप्रमाणे रविवारी क्लासला निघाली होती. त्यावेळी पिडीतेसोबत तिची आईदेखील होती. पिडीता ही लोणी काळभोर गावातील कृष्णा मॅचिंग साडीच्या दुकानाजवळ आली असता, आरोपी युवराज सोनवणे हा तिथे आला.
त्यानंतर आरोपीने पिडीतेला हटकले. ‘माझ्याशी बोल, आपण पळून जाऊ’ असे म्हणत पिडीतेशी लगट करू लागला. तसेच पिडीतेच्या मनाला लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केले. यावेळी पिडीतेच्या आईस हाताने मारहाण व शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी पिडीतेच्या आईने तत्काळ लोणी काळभोर पोलीस ठाणे गाठले व आरोपीच्या विरोधात फिर्याद दिली. त्यानुसार आरोपीच्या विरोधात विनयभंग, बाल लैंगिक अत्याचार व विविध गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल होताच, लोणी काळभोर पोलिसांनी आरोपीला अवघ्या एक तासाच्या आत मोठ्या शिताफीने अटक केली.
ही कामगिरी लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र करणकोट यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक अनिल जाधव, पोलीस हवालदार गणेश सातपुते, चक्रधर शिरगिरे व योगेश पाटील यांच्या पथकाने केली आहे. पुढील तपास लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षक पूजा माळी करीत आहेत.