नीरा : पुणे-पंढरपूर पालखी महामार्गावरील नीरा-लोणंद परिसरात खड्ड्यात मोटारसायकल आदळून एका तरुणीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तर या अपघातात दोघे गंभीर जखमी झाले आहेत. अंकीता अनिल धायगुडे (वय २०) असं या अपघातात मृत्यू झालेल्या तरुणीचे नाव आहे. तर विशाल दौलत धायगुडे (वय-२७), सानिका विलास धायगुडे ( वय-१८ ) असं जखमी झालेल्यांची नावे आहेत. ही घटना सोमवारी (दि. ०६) सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास लोणंद-निरा रस्त्यावर घडली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, सोमवार सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास माणिक सोना पेट्रोल पंपा जवळ बाळूपाटलाचीवाडी येथील तिघेजण मोटार सायकल वरून जात होते. त्यावेळी त्यांची मोटारसायकल खड्ड्यात कोसळली. यावेळी अंकिता अनिल धायगुडेचा जागीच मृत्यू झाला. तर चालक विशाल धायगुडे , सानिका धायगुडे हे दोघे गंभीर जखमी झाले आहे.
पालखी मार्गावरील लोणंद ते नीरा दरम्यान रस्त्यात लोणंद नागरपंचायतच्या पाणी लाईनचे दुरुस्तीचे काम चालू होते. सदर ठिकाणी ठेकेदाराकडून कोणत्याही प्रकारचे बॅरीगेटस् किंवा अडथळा उभारला नसल्याने या कामासाठी खोदलेल्या खड्ड्यात पाणी साचल्यामुळे रस्त्यावरच असणारा हा खड्डा वाहनचालकांच्या लक्षात येत नाही. त्यामुळे हा अपघात घडला असल्याची शक्यता स्थानिकांकडून व्यक्त केली जात आहे. या प्रकरणी संबंधितांवर लोणंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम ऊशीरापर्यंत सुरु होते.