राहुलकुमार अवचट / यवत : दौंड तालुक्यातील पश्चिम भागातील यवत – खामगाव (तांबेवाडी) या रस्त्याची प्रचंड दुरावस्था झाली आहे. रस्त्यात अनेक ठिकाणी खड्डे पडले असल्याने रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता असा प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहेत. यवत वरुन खामगाव मार्गे उत्तर भागात जाण्यासाठी हा जवळचा रस्ता असून यवत स्टेशन ते तांबेवाडी रस्त्याची काही अपवाद वगळता फार दुरावस्था झालेली आहे.
दौंड तालुक्याच्या खामगाव, दहिटणे, देवकरवाडी, मिरवडी, नांदुर या गावातील नागरिकांना विविध बाबींसाठी यवत परिसरात यावे लागत असुन हा जवळचा मार्ग असल्याने सध्या रस्त्याची दुरावस्था झाल्याने नागरिकांना तीन किलोमीटरचा अधिक वळसा घालून ये – जा करावी लागत आहे. यवत येथे रेल्वे स्टेशन असल्याने खामगाव, तांबेवाडी यांसह आजूबाजूच्या परिसरातील अनेक नोकरदार, विद्यार्थी, शेतकरी पुणे शहराकडे जात असल्याने या रस्त्यावर रहदारी सतत सुरु असते.
परंतु सध्या रस्त्याची अवस्था खड्डेमय झाली असल्याने नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. सध्या दौंड तालुक्यात अनेक ठिकाणी बिबट्याचा वावर असून या परिसरात जवळच काही दिवसांपूर्वी बिबट्या नागरिकांना दिसून आल्याने या रस्त्यावरून खड्ड्यातून अनेक जण आपला जीव मुठीत धरून ये जा करीत आहेत.
यवत हद्दीतील काम काही महिन्यांपूर्वी पूर्ण झाले असले तरी यापुढील रस्ता हा अनेक दिवसापासून खराब झालेला आहे. झालेल्या दुरावस्थेमुळे या रस्त्यावर अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. झालेली दुरावस्था, आजूबाजूची काटेरी झुडुप व खड्डेमय झालेल्या रस्त्याने प्रवास करायचा झाला तर नागरिकांना फार मोठी कसरत करावी लागत आहे.
अनेक वर्षांपासून रस्त्याची झालेली दुरावस्था आणखी किती दिवस अशीच राहणार आहे? किती दिवस येथील नागरिकांना रस्त्याचा त्रास सहन करावा लागेल ? असे अनेक प्रश्न येथील नागरिकांना पडत आहेत. बांधकाम विभाग व संबंधित प्रशासनाने याकडे लवकरात लवकर लक्ष देऊन तात्काळ रस्त्याची सुधारणा करावी अशी मागणी नागरिक करीत आहेत.