राहुल अवचट
यवत : दसरा, दिवाळी या सणानिमित्त झेंडूच्या फुलांना मोठी मागणी असते. हिच मागणी लक्षात घेत यवत (ता. दौंड) परिसरातील शेतकरी व व्यापाऱ्यांनी झेंडूची फुले विक्रीसाठी आणल्याने बाजारपेठ सजली आहे.
साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या दसरा – विजयादशमी निमित्ताने यवत मुख्य बाजारपेठ फुलांनी सजली असुन दसऱ्यासाठी फुले , आपट्याची पाने, सोने – चांदी व इतर वस्तुंच्या खरेदीसाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. कोरोना माहामारीमुळे गेली दोन वर्ष दसरा साजरा करण्यावर निर्बंध होते.
दसरा सण असल्याने परिसरात मोठ्या संख्येने झेंडूचे फुले विक्रीसाठी आलेली आहे. त्यामुळे येथील चौक व रस्ते फुलांनी सजले आहेत. यावर्षी कोणतेही निर्बंध नसल्याने मोठ्या उत्साहात दसरा साजरा होत आहे. मंगळवारी (ता. ०४) सायंकाळपासून शेतकरी व फुल विक्रेत्यांनी कागदे टाकून आपली जागा निश्चित करुन ठेवल्या होत्या. तसेच पहाटे पासुनच फुलांची दुकाने थाटू लागली ८० ते १०० रु किलो प्रमाणे फुलांचे बाजार होते. यवत परिसरात फुलांची शेती मोठ्या प्रमाणात असल्याने आवक जास्त होती फुलांप्रमाणेच आपट्याची व आंब्याच्या पानांचीही विक्री मोठ्या प्रमाणात होती.
दरम्यान, दसरा व दिवाळी असल्याने सोने – चांदी, टि.व्ही, फ्रिज यासारख्या इतर वस्तु खरेदीसाठी यवत व आजूबाजूच्या गावातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती