मुंबई : देवेंद्र फडणवीसजी आपल्या पक्षाचे आमदार सुरेश धस यांनी काल परभणी मधील मुक मोर्चात ‘क्या हुआ तेरा वादा अजितदादा’ अशा प्रकारे वक्तव्य करून आदरणीय अजितदादांविषयी जी गरळ ओकली त्याबद्दल आपण त्यांना जाब विचारणार, की त्यांचा बेभान सुटलेला बैल आणखी मोकाट सोडणार? असा सवाल करत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरींनी जाब विचारला आहे. आमदार अमोल मिटकरींनी एक्सवर पोस्ट करत हा प्रश्न विचारला आहे. परिणामी भाजपचे आमदार सुरेश धस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांवर केलेल्या टीकेनंतर राष्ट्रवादी आता आक्रमक झाली झाली आहे. आमदार सुरेश धस यांची दखल घेण्याचे आवाहन राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून करण्यात येत असल्याचे पाहायला मिळत आहे.
सरपंच संतोष देशमुख हत्येच्या निषेधार्थ शनिवारी परभणीमध्ये सर्वपक्षीय मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चातील सभेतून भाजपचे आमदार सुरेश धस यांनी ‘अजित दादा क्या हुआ तेरा वादा, काय को इसको अंदर लिया?’ असे म्हणत त्यांनी धनंजय मुंडे यांच्या मंत्रिमंडळातील समावेशावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधला होता.
सुरेश धस यांनी अजित पवार यांना घेरताच राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. यावर आमदार अमोल मिटकरी यांनी एक्सवर पोस्ट करत आमदार सुरेश धसांची एक प्रकारे तक्रार थेट देवेंद्र फडणवीसांकडे केली आहे. तर दुसरीकडे आरोपी स्वतः होऊन आत्मसमर्पण करत आहेत. मग गृह खातं झोपा काढत आहे का? असा सवाल राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रवक्ते सुरज चव्हाण यांनी विचारला आहे.
मग गृह खातं झोपा काढत आहे का?? : सुरज चव्हाण
सुरज चव्हाण यांनी ‘एक्स’ पोस्ट शेअर करत सुरेश धस यांच्यावर टीका केली आहे. त्यांनी म्हटलंय की, स्व. संतोष देशमुख यांच्या हत्येवरून आ. सुरेश धस जाणीवपूर्वक राजकारण करत आहेत. परभणीच्या सभेत अजितदादांना क्या हुआ तेरा वादा… म्हणून दादांना प्रश्न विचारणाऱ्या सुरेश अण्णाला माझा प्रश्न आहे. आरोपी स्वतः होऊन आत्मसमर्पण करत आहेत. मग गृह खातं झोपा काढत आहे का? निष्पक्ष चौकशी होईल म्हणून तुमचा गृहखात्यावर आणि गृहमंत्र्यावर विश्वास नाही का? स्व. संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा एक जरी नेता, कार्यकर्ता जर चौकशीत दोषी आढळला तर अजितदादा त्यांच्यावर कार्यवाही करायला गय करणार नाहीत, असेही त्यांनी म्हटले आहे.
श्री @Dev_Fadnavis जी आपल्या पक्षाचे आमदार श्री सुरेश धस यांनी काल परभणी मधील मुक मोर्चात क्या हुआ तेरा वादा अजितदादा अशा प्रकारे वक्तव्य करुन आदरणीय अजितदादाविषयी जी गरळ ओकली त्याबद्दल आपण त्यांना जाब विचारणार की त्यांचा बेभान सुटलेला बैल आणखी मोकाट सोडणार?
— आ. अमोल गोदावरी रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) January 5, 2025
काय म्हणाले होते सुरेश धस ?
ज्या पद्धतीने यांनी संतोषला मारले ती कोणती पद्धती आहे? छत्रपती संभाजीराजेंच्या हत्येप्रमाणेच ही हत्या झाली आहे. त्या लेकराने काय बिघडवले होते? आकाचे आका करलो, जल्दी तयारी, हम निकले है जेलवारी, असा जोरदार हल्लाबोल भाजपचे आमदार सुरेश धस यांनी केला होता. तर अजित दादा क्या हुआ तेरा वादा, काय को इसको अंदर लिया? असे म्हणत त्यांनी धनंजय मुंडे यांच्या मंत्रिमंडळातील समावेशावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधला. संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ काल (4 जानेवारी) परभणीत सर्वपक्षीय मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चाच्या सभेतून सुरेश धस यांनी अजित दादांवर निशाणा साधला होता.