हनुमंत चिकणे
उरुळी कांचन, (पुणे) : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मागील दोन वर्षे आरोग्याच्या दृष्टीने अतिशय वाईट गेली आहेत. यावर्षी सर्वात प्रथम नागरिकांचे आरोग्य चांगले राहू दे. आणि चांगला पाऊस पडू दे, असे विठ्ठल चरणी पुरंदरचे आमदार संजय जगताप यांनी साकडे घातले केले.
आषाढी एकादशीनिमित्त प्रती पंढरपूर श्री विठ्ठल देवस्थान डाळिंब (बन) (ता. दौंड) येथे रविवारी (ता. १०) सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास पुरंदरचे आमदार संजय जगताप आणि त्यांच्या सुविद्य पत्नी राजवर्धिनी जगताप यांचे हस्ते विठ्ठलाची महापूजा करण्यात आली आली. यावेळी आमदार जगताप यांनी वरील साकडे घातले.
यावेळी जिल्हा परिषद सदस्या कीर्ती कांचन, आदर्श माजी जिल्हा परिषद सदस्य महादेव कांचन, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य संतोष कांचन, माजी उपसभापती हेमलता बडेकर, दौंड पंचायत सदस्य सुशांत दरेकर, नितीन दोरगे, दौंड कॉंग्रेसचे अध्यक्ष विठ्ठल खराडे, मणिभाई पतसंस्थेचे अध्यक्ष राजेंद्र कांचन, उरुळी कांचनचे सरपंच राजेंद्र बबन कांचन, जेष्ठ नेते माउली कांचन, रामदास चौधरी, भाऊसाहेब कांचन आदी संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यापुढे बोलताना आमदार जगताप म्हणाले, “मी सोपान नगरी सासवड येथे राहतो, विठ्ठलबन आणि सोपान नगरीची भावनिक आणि भक्तीची नाळ आहे. त्यामुळे येथे येण्याची ओढ वाटते. आणि येथे येऊन दर्शन घेतल्यावर आत्मिक समाधान लाभते.
दौंडचे आमदार राहुल कुल म्हणाले, “डाळिंब बन आणि परिसराच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्न करण्यात येत आहे. दौंड आणि पुरंदर पाण्याबाबत आमदार जगताप यांनी सहकार्याची भूमिका घ्यावी, यापुढेही येथील विकासाला प्राधान्य देण्यात येईल. याप्रसंगी दौंडचे माजी आमदार रमेश थोरात यांनीही आपले विचार व्यक्त केले.”कार्यक्रमाचे सूत्र संचालन एल. बी. म्हस्के यांनी केले. प्रास्तविक देवस्थानचे अध्यक्ष राजेंद्र काचंन यांनी केले तर आभार सचिव तानाजी म्हस्के यांनी मानले.
संजय जगताप यांची देवस्थानला ५ लाख रुपये देणगी …
मी पुरंदरचा आमदार आहे त्यामुळे मी येथे आलो तरी मला निधी देत येत नाही. तरीही येथे येण्याची ओढ लक्षात घेऊन मी माझे वडील स्वर्गवासी चंदुकाका जगताप यांचे समरणार्थ पाच लाख रुपये देवस्थान विकास कामास देत असल्याची ग्वावी आमदार संजय जगताप यांनी यावेळी दिली.
डाळींब रस्त्याकडे लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष…! डाळींब बन देवस्थानकडे जाणाऱ्या उरुळी कांचन ते पांढरस्थळ मार्गे रस्त्याची प्रचंड दुरआवस्था झाली आहे. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून सदर रस्त्याचे काम २०१९ साली झाले आहे. या रस्त्याचे ५ वर्षाकरीता दुरुस्तीची जबाबदारी ठेकेदाराची असताना ठेकेदार दुरुस्तीची कामे करीत नसल्याची स्थिती आहे. स्थानिक लोकप्रतिनिधींनीचा दुरुस्तीचा पाठपुरावा नसल्याने या ठिकाणी प्रशासन ठप्प आहे. ठेकेदाराचा ५ वर्षाचा दुरूस्ती चा कालावधी पुढील वर्षांत संपणार आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधी व मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या अनास्थेपायी भरीव निधी पाण्यात जाण्याची शक्यता आहे.