लोणी काळभोर : शेतकऱ्यांनी जमिनीच्या आरोग्याचे महत्त्व समजून घेऊन राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत जमिनीची आरोग्य पत्रिका तयार करण्यासाठी माती परीक्षण करावे. माती तपासणी अहवालानुसार पिकांना संतुलित व योग्य खते वापरावीत, असे आवाहन हडपसरचे कृषी पर्यवेक्षक मेघराज वाळुंजकर यांनी केले.
लोणी काळभोर (ता.हवेली) ग्रामपंचायतीच्या सभागृहात महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत ‘जागतिक मृदा दिन’ साजरा करण्यात आला. यावेळी जागतिक मृदा दिनाचे महत्त्व विशद करताना वाळुंजकर बोलत होते. यावेळी हवेली तालुका कृषी अधिकारी मारुती साळे, हडपसर मंडल कृषी अधिकारी गणेश धस, सरपंच सविता लांडगे, कृषी सहायक मुक्ता गर्जे, ज्योती हिरवे, पुष्पा जाधव, सौरभ जाधव, प्रगतशील शेतकरी उत्तम दुंडे, गणेश काळभोर, दत्तात्रय काळभोर, विजय महानवर, कृषीमित्र वर्षा काळभोर व इतर शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी मेघराज वाळुंजकर यांनी जमिनीचे आरोग्य व्यवस्थापन करताना जमिनीतील सेंद्रिय कर्ब, उपयुक्त सुक्ष्म जिवाणुंचे संवर्धन, पिकांचा फेरपालट, एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन, एकात्मिक कीड रोग नियंत्रण, सेंद्रिय व जैविक खतांचा वापर, सुक्ष्म अन्नद्रव्यांचे पीक उत्पादन मधील महत्त्व, जमिनीतील उपलब्ध अन्नद्रव्यांचे व्यवस्थापन या विषयावर उपस्थित शेतकऱ्यांना माहिती दिली. यावेळी उपस्थित शेतकऱ्यांना जमिन आरोग्य पत्रिकांचे वाटप करण्यात आले. तपासणी अहवालानुसार कृषी विद्यापीठांच्या शिफारशी नुसार पिकांच्या खत व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन केले.
शेतकऱ्यांनी युरिया खताचा नियंत्रित वापर करून नत्र उपलब्ध करुन देणारे जिवाणू, स्फुरद विरघळणारे जिवाणू, पालाश उपलब्ध करून देणारे जिवाणू, सुक्ष्म अन्नद्रव्य उपलब्ध करून देणारे जिवाणू यांच्या वापराबाबत मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन कृषी सहायक मुक्ता गर्जे यांनी केले. राष्ट्रीय कृषी विकास योजना अंतर्गत माती तपासणी करुन जमिनीची आरोग्य पत्रिका तयार करण्याचे आवाहन त्यांनी उपस्थित शेतकऱ्यांना केले. तसेच कृषी विभागाच्या विविध योजना कृषी यांत्रिकीकरण, सुक्ष्म सिंचन, कृषी प्रक्रिया उद्योग, महिला बचत गटांच्या कृषी योजना, अनुदानित ड्रोन खरेदी व वापर योजना या बाबतीत उपस्थित शेतकऱ्यांना मुक्ता गर्जे यांनी माहिती दिली.