पुणे : बांधकामच्या ठिकाणी शेडचे काम करताना एका कामगाराचा तोल जाऊन खाली पडल्याने मृत्यू झाला आहे. ही घटना नऱ्हे भागातील वरद एंटरप्रायझेस येथे गुरुवारी दुपारी घडली आहे. या दुर्घटनेत एक कामगार जखमी झाला आहे. याप्रकरणी ठेकेदार सुरेश अरविंद पांचाळ यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विलास बाबुराव पांचाळ (वय 62, रा. आनंदप्रभात अपार्टमेंट, शिवणे) असे मृत्युमुखी पडलेल्या कामगाराचे नाव आहे. तर जखमी झालेल्याचे नाव पांडुरंग बाबुराव काळे असे आहे. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी ठेकेदार सुरेश पांचाळ यांचा फॅब्रिकेशनचा व्यवसाय आहे. विलास पांचाळ, पांडुरंग काळे हे त्यांच्याकडे कामाला आहेत. न-हे भागातील वरद एंटरप्रायझेस येथे पत्र्याची शेड उभे करण्याचे काम ठेकेदार सुरेश पांचाळ यांना देण्यात आले होते. गुरुवारी दुपारी ते शेडचे काम करत होते त्यावेळी तोल जाऊन त्यांचा मृत्यू झाला. कामगारांना सुरक्षाविषयक साधने न पुरविता दुर्घटनेस जबाबदार असल्याच्या आरोपावरुन ठेकेदाराविरुद्ध सिंहगड रस्ता पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी पुढील तपास पोलीस करत आहे.