लोणी काळभोर : लोणी स्टेशन (कदमवाकवस्ती, ता. हवेली) येथील एबीके अंबिका ज्वेलर्सच्या दुकानातील सोन्याचे दागिने कामगारांनी चोरल्याची घटना रविवारी (ता. 22) दुपारी चार वाजण्याच्या सुमारास घडली होती. या गुन्ह्यातील फरार झालेल्या आरोपीला लोणी काळभोर पोलिसांनी महाराष्ट्र व तेलंगणाच्या सीमेवरून मोठ्या शिताफीने अटक केली आहे. त्याच्याकडून 4 लाख 34 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे. लोणी काळभोर पोलिसांनी आठच दिवसाच्या आत गुन्ह्याची उकल करून आरोपीला अटक केली आहे. त्यामुळे त्यांच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
अमोल विठ्ठल गवळी (वय-23, सध्या रा. पांडवदंड, फुरसुंगी, ता. हवेली) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तर याप्रकरणी सुवर्ण पेढीचे मालक बाबासाहेब वामन गायकवाड (वय-47, वाकवस्ती, कदमवाकवस्ती, ता. हवेली) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी बाबासाहेब गायकवाड हे कदमवाकवस्ती येथील रहिवासी असून एक व्यावसायिक आहेत. त्यांचे पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील लोणी स्टेशन चौकात एबीके अंबिका ज्वेलर्स या नावाने सुवर्ण पेढी आहे. या दुकानातून सोने चांदी खरेदी विक्री केली जाते. आणि दुकानातील कामगार सोने विक्रीचे काम करतात.
फिर्यादी गायकवाड यांच्या दुकानातील कामगार अमोल गवळी याने दुकानातील 4 लाख 36 हजार रुपये किंमतीच्या 6 सोन्याच्या चैन चोरी करून पळून गेला होता. याप्रकरणी अमोल गवळी याच्यावर लोणी काळभोर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय दंड संहिता कलम 306 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, सदर गुन्ह्याचा तपास करीत असताना पोलिसांना आरोपी गवळी हा महाराष्ट्र व तेलंगणा राज्य सिमेवरील देगलुर गावी पळून गेला असल्याची माहिती एका खबऱ्या मार्फत मिळाली. मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने पोलिसांनी सदर ठिकाणी सापळा रचून आरोपीला मोठ्या शिताफीने अटक केली. त्याच्याकडून गुन्ह्यातील 4 लाख 36 हजार रुपयांच्या सोन्याच्या चैनी जप्त करण्यात आल्या आहेत. तसेच आरोपीने सदर गुन्ह्याची कबुली पोलिसांना दिली आहे. पुढील तपास लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षक पूजा माळी करीत आहेत.
ही कामगिरी लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र करणकोट यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पुजा माळी, पोलीस उपनिरीक्षक सर्जेराव बोबडे, पोलीस हवालदार योगेश कुंभार, पोलीस हवालदार तेजस जगदाळे, पोलीस हवालदार संभाजी देवीकर, पोलीस अंमलदार तुकाराम येडे व पोलीस अंमलदार अजिंक्य जोजारे यांच्या पथकाने केली आहे.