लोणी काळभोर : लोणी काळभोर (ता. हवेली) ते तीर्थक्षेत्र रामदरा शिवालय यादरम्यानचा रस्ता तयार करण्यासाठी मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत सुमारे २ कोटी ८८ लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला. या रस्त्याचा भूमिपूजन सोहळा ऑगस्ट महिन्यात शिरूर हवेलीचे कार्यसम्राट आमदार ऍड. अशोक पवार यांच्या उपस्थितीत मोठ्या थाटामाटात करण्यात आला. मात्र, या रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच उघडकीस आला आहे.
लोणी काळभोर ते रामदरा हा रस्ता व्हावा, अशी मागणी नागरिकांसह भाविकांनी वारंवार आमदार अशोक पवार यांच्याकडे केली होती. या रस्त्याचा प्रस्ताव मंजूर व्हावा. यासाठी आमदार अशोक पवार वारंवार पाठपुरवठा करत होते. त्यांनी केलेल्या पाठपुराव्यांना यश आले आणि या रस्त्याच्या विकासकामांसाठी शासनाकडून तब्बल २ कोटी ८८ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला.
या कामाची निविदा प्रसिद्ध झाल्यानंतर हे काम मे. पेव्हवे कन्स्ट्रक्शन प्रा. लि. वानवडी, पुणे यांना देण्यात आले आहे. या रस्त्याचे डांबरीकरणाचे काम सुमारे ४.२०० किलोमीटर आहे. हे काम ३० ऑगस्ट २०२३ रोजी सुरु करण्यात आले. हे काम २९ फेब्रुवारी २०२५ पर्यंत ठेकेदाराने पूर्ण करायचे आहे. तसेच या ठेकेदाराला या रस्त्याच्या देखभाल व दुरूस्तीसाठी पाच वर्षांसाठी ३० लाख ६० हजारांचे काम देण्यात आले आहे.
या रस्त्यावर खोदकाम कमी करण्यात येत असून, त्यात मुरूम न टाकता चक्क माती टाकण्यात येत असल्याचे दिसून आले आहे. रस्ता सुरुवातीपासूनच निकृष्ट दर्जाचा करण्यात आला तर हा रस्ता किती काळ टिकेल की नाही, हे रामभरोसे आहे. कारण, हा रस्ता नेहमीच वाहनांनी गजबजलेला असतो. संबंधित कंत्राटदाराने मातीमिश्रित मुरुमाचा सपाटा लावला आहे. याने दिवसभर रस्त्यावर धुळीचे साम्राज होत आहे.
चोपण मातीचा विशेष गुण म्हणजे मातीत ओलावा असेपर्यंतच घट्ट पकड ठेवणारी ही माती आहे. कोरडेपणा सुरू होताच ही माती धुळीत परिवर्तीत व्हायला सुरुवात होते. येथून गाडी चालवताना नागरिकांना अक्षरशः नाकीनऊ येत आहे. ही बाब शासकीय अधिकाऱ्यांना दिसत नाही का? असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
कामांचा माहितीफलक मोबाईल नंबरसह लावावा
सुरू असलेल्या रस्त्याचे खोदकाम किती खोल आहे? त्यामध्ये कोणते साहित्य टाकले जाणार? मुरूम, गिट्टीचे थर किती इंचाचे व किती राहतील? वरचा थर कसा असेल? रस्त्यांची उंची किती असेल? याबाबतचा सविस्तर माहिती फलक काम करणाऱ्या कंपनीने मोबाईल नंबरसह रस्त्यालगत लावावा, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.
वाहनाचालकांना बाळगावी लागतीये सावधगिरी
लोणी काळभोर ग्रामपंचायत हद्दीतील कोळपे वस्ती, केसकर वस्ती, रुपनर वस्ती, ढेले वस्ती, फुरसुंगी रेल्वे स्थानकावर जाण्यासाठी व या परिसरातील शेताकडे तसेच तीर्थक्षेत्र रामदरा शिवालयात जाण्यासाठी याच पुलाचा वापर करून जावे लागते. तसेच वाहनचालकांना सावधानता बाळगत या मार्गावरून जावे लागत आहे.
चांगल्या दर्जाचा रस्ता होणे आवश्यक
तीर्थक्षेत्र रामदरा येथे येणाऱ्या भाविकांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. पुणे शहर व परिसरातील नागरिकांना धार्मिक, नैसर्गिक पर्यटन करण्यासाठी व हौशी तरुणांना ट्रेकिंगचे प्राथमिक धडे गिरवण्यासाठी असलेला सह्याद्रीच्या पर्वतरांगातील डोंगर यामुळे या ठिकाणी खूप मोठ्या संख्येने पर्यटक येत आहेत. त्यामुळे हा रस्ता चांगल्या दर्जाचा होणे आवश्यक होते.
दुर्घटना घडण्यापूर्वीच कॅनलवर नवीन पूल बांधावा
गेल्या वर्षभरापासून फुरसुंगी रेल्वे स्थानकावर मालधक्का सुरू झालेला आहे. या मालधक्क्यावरुन सिमेंट, सिमेंटसदृष्य माती आदी वस्तूंची वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू झाली आहे. ३० ते ३५ टन माल भरलेल्या ट्रक या कॅनलच्या पूलावरून जातात. त्यावेळी पूल अक्षरशः हलतो. एखाद्या गाडीसह पूल लवकरच कोसळेल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. एखादी दुर्घटना घडण्यापूर्वीच या ठिकाणी नवीन पूल बांधावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.