मालवण: मालवण किनारपट्टीवरील किल्ले राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्यदिव्य पुतळा नव्याने उभारण्यात येणार आहे. या कामाच्या फाऊंडेशनची खोदाई सुरू करण्यात आली आहे. राज्य सरकारने याठिकाणी ६० फूट उंच पुतळा उभारण्याचे काम ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार आणि त्यांचा मुलगा अनिल सुतार यांच्या कंपनीला दिले आहे. राम सुतार आर्ट क्रिएशन्स प्रा. लि. या कंपनीने याआधी गुजरातमधील ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ या सरदार वल्लभभाई पटेलांच्या पुतळ्याचे काम पाहिले होते. देशभरात मोठमोठे पुतळे दर्जेदार पद्धतीने उभारण्याचा त्यांना मोठा अनुभव आहे.
राज्य शासनाने राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची रचना, अभियांत्रिकी, बांधकाम, उभारणी, संचलन आणि देखभाल दुरुस्ती करण्याची निविदा प्रसिद्ध केली होती. इतर निविदांची तुलना केल्यानंतर राम सुतार यांच्या कंपनीला हे काम देण्यात आले आहे. कांस्य धातूपासून ६० फूट उंचीचा ८ मिमी जाडीचा पुतळा तयार होत आहे. डोक्यापासून पायापर्यंत पुतळ्याची उंची ६० फूट इतकी असणार आहे. निविदेनुसार १०० वर्षे टिकेल असा पुतळा बांधण्याची अट घातली गेली आहे.