पुणे : बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या आणि परभणीतील हिंसाचारानंतर पोलिस ठाण्यातच सोमनाथ सूर्यवंशी यांचा संशयास्पद मृत्यू, या घटनांनी राज्य ढवळून निघाले आहे. या सर्व घटनांमुळे राज्य सरकारची चांगलीच कोंडी झाली आहे. विरोधकांकडूनही जोरदार हल्ले केले जात आहेत. अशातच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी एक विधान केले आहे.
खासदार सुप्रिया सुळे यांनी या दोघांना न्याय मिळाला नाही तर पुढचा महाराष्ट्र कसा असेल? माझ्या मनात भिती वाटतेय, असे विधान केले आहे. तसेच मला महाराष्ट्रात फिरताना कधीही भिती वाटली नाही. पण आता महिला म्हणतात, आम्हाला भीती वाटत आहे, अशी प्रतिक्रियाही खासदार सुळे यांनी दिली आहे.
सुप्रिया सुळे पुढे म्हणाल्या की, राजकारणाच्या पुढे जाऊन नात्यातला ओलावा कुणाचा असेल तर त्यांचं नाव शरद पवार आहे. बीड आणि परभणीला पहिले साहेब गेले. त्यानंतर सत्तेमधील जे इतके दिवस महाराष्ट्रातच होते ते आता जात आहेत. पण पहिले जाणारे आमचे खासदार बजरंग सोनवणे जे पार्लमेंन्ट सोडून बीडला गेले. पवार साहेब हे पहिले नेते आहेत जे बीड आणि परभणीला जाऊन आले. मुख्यमंत्र्यांना विनंती करेल की हा विषय खूप गंभीर आहे. या संदर्भात एसआयटी लावली आहे, पण पोलिसांची बदली केली पण त्यावरून प्रश्न सुटत नाहीत. याच्या मागे कोणाचं षडयंत्र आहे त्याला शिक्षा झाली पाहिजे. पोलिसांवर कशाला अन्याय करता. कदाचित कोणीतरी मोठ्या माणसाने त्याला ऑर्डर दिली असेल. परभणीच्या घटनेमागे नक्की कोण आहे? हे महाराष्ट्राला कळालं पाहिजे. अशी सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.
दोन्ही घटना पुरोगामी महाराष्ट्राला न शोभणाऱ्या..
ज्या क्रूर पद्धतीने या दोन्ही घटना झाल्यात त्या दोन्ही घटना सुसंस्कृत आणि पुरोगामी महाराष्ट्राला न शोभणाऱ्या असून बीड आणि परभणीच्या घटना अतिशय अस्वस्थ करणाऱ्या आहेत. आपल्या महाराष्ट्रात अशा घटना घडत आहेत. तुमच्या आणि माझ्या महाराष्ट्रात अशा घटना होऊ शकतात याचा मला विश्वास बसत नाही. जे धक्कादायक आहे. अशी प्रतिक्रिया खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली आहे.