पुणे: दौंड ते बारामती दरम्यानच्या रेल्वेस्थानकावर प्लॅटफार्मचे काम अर्धवट असल्याने कटफळ स्टेशनवर रेल्वेगाडीत चढताना महिला घसरून पडल्याने तिचा पाय मोडला. ही घटना सोमवारी (दि. ९ डिसेंबर) सकाळी आठच्या सुमारास घडली. या अपघातामुळे बारामती ते पुणे या डेमू गाडीला एक तासाचा विलंब झाला. ही गाडी उशिरा धावल्याने नोकरदार, विद्यार्थी आणि व्यापारी वर्गाला पुण्यात पोहोचण्यास विलंब झाला.
दौंड ते बारामती दरम्यानच्या सर्वच रेल्वेस्थानकांवर प्लॅटफार्म उभारणीचे काम सुरू आहेत. ते अपूर्ण असल्याने रेल्वे प्रवाशांना चढताना आणि उतरताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर तातडीने या स्टेशनवर प्लॅटफार्म उभारण्याचे काम पूर्ण करण्यात यावे, अशी मागणी रेल्वे प्रवाशांकडून करण्यात आली.
सुमारे दहा वर्षांपूर्वी पुणे ते दौड दरम्यान मांजरी या रेल्वेस्थानकावर प्लॅटफार्म नसल्याने गाडीत चढताना पाय घसरल्याने केडगाव येथील एका तरुणीचा दुर्दैवी अंत झाला होता. या घटनेनंतर तातडीने रेल्वे प्रशासनाकडून मांजरी आणि कडेठाण या ठिकाणी प्लॅटफार्मची उभारणी करण्यात आली.
प्लॅटफार्म तयार झाल्याने आता महिलांना या ठिकाणी गाडीत चढणे आणि उतरणे सुलभ झाले आहे. मात्र, दौंड ते बारामती दरम्यान स्टेशनच्या उभारणीचे काम सुरू आहे. हे काम सुरू असताना सोमवार, दि. ९ हा प्रकार घडला. या घटनेमुळे अध्र्याअर्ध्या तासापेक्षा जास्त काळ बारामती ते पुणे ही डेमू गाडी एका जागेवर उभी होती. त्यामुळे या डेमू गाडीचे पुढील नियोजन फसले. ही गाडी पुण्यात पोहोचण्यास विलंब झाला. पुणे ते दौंड दरम्यान पंधरा वर्षांपूर्वी विद्युतीकरण करण्यात आले आहे. अजूनही डिझेलवर चालणाऱ्या डेमू लोकल या ठिकाणी सुरू आहेत. त्यात डिझेलवर चालणाऱ्या गाड्यांना स्पीड नसल्याने विलंब होत आहे.