शिरूर : पुणे–अहिल्यानगर महामार्गावरील शिरूर शहरालगतच्या ऐतिहासिक सतरा कमानी पुलावरून चाळीशीतील एका महिलेने घोडनदीच्या पात्रात उडी घेतल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी सायंकाळी सुमारे पाच वाजण्याच्या सुमारास घडली.डिंभे धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने घोडनदी दुथडी भरून वाहत होती. प्रचंड वेगाच्या पाण्याच्या लोंढ्यात महिला क्षणार्धात बेपत्ता झाली. रात्री उशिरापर्यंत तिचा शोध सुरू होता.

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार,अंदाजे ४० ते ४५ वर्षे वयोगटातील ही महिला काही काळ सतरा कमानी पुलावर अस्वस्थपणे येरझाऱ्या घालत होती.त्यानंतर ती पुलाच्या कठड्यावर जाऊन बसली आणि आजूबाजूच्या लोकांना काही समजण्याच्या आतच तिने थेट नदीपात्रात उडी घेतली.

याचवेळी घटनास्थळापासून काही अंतरावर पुण्याकडे जाणारी एक बस बंद पडली होती.बस दुरुस्तीसाठी आलेल्या कामगारांनी महिला नदीत उडी मारल्याचे पाहताच तिच्या मदतीसाठी धाव घेतली.मात्र,नदीतील पाण्याचा वेग आणि खोली प्रचंड असल्याने त्यांचे सर्व प्रयत्न निष्फळ ठरले.त्यांनी तात्काळ शिरूर पोलिसांना घटनेची माहिती दिली.

ही घटना अनेक वाहनचालकांच्या नजरेसमोर घडल्याने महामार्गावर काही काळ वाहनांच्या रांगा लागल्या.अनेकांनी वाहने थांबवून घटनास्थळी धाव घेतल्याने मोठी गर्दी झाली आणि काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला.
माहिती मिळताच शिरूर पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. मात्र,नदीतील पाण्याचा प्रचंड प्रवाह आणि वाढलेली खोली यामुळे महिलेचा कोणताही ठावठिकाणा लागू शकला नाही. प्राथमिक पाहणीत ही आत्महत्येची घटना असावी,असा अंदाज व्यक्त केला जात असला तरी पोलिस सर्व बाजूंनी तपास करीत आहेत.
संबंधित महिलेची ओळख अद्याप पटलेली नसून ती नेमकी कोणत्या गावातील अथवा कोणत्या तालुक्यातील आहे,याचा शोध सुरू आहे.सतरा कमानी पूल हा शिरूर,पारनेर आणि श्रीगोंदे तालुक्यांच्या सीमेलगत असल्याने तिन्ही तालुक्यांतील पोलिस यंत्रणांना सतर्क करण्यात आले आहे.तसेच नदीकाठच्या गावांतील पोलिस पाटील व स्थानिक प्रशासनालाही माहिती देण्यात आली असून, महिलेची ओळख पटविणे आणि तिचा शोध घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.







