आदित्य बोराटे

इंदापूर : अल्पवयीन मुलीला तिच्या आई व भावाला जीवे मारण्याची धमकी देऊन तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या अत्याचारात संबंधित अल्पवयीन मुलगी गरोदर राहिल्यानंतर ही घटना उघडकीस आली. याबाबत पिडीतेच्या आईने इंदापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. याप्रकरणी विजय तानाजी भिसे (रा. इंदापूर, ता. इंदापूर, जि. पुणे) याच्याविरुद्ध इंदापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलीची आई मजुरीचे काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करते. मुलगी अल्पवयीन असल्याचे माहीत असतानाही, आरोपी विजय भिसे याने ऑगस्ट 2025 पासून आई कामावर बाहेर गेल्यानंतर तिच्या राहत्या घरी घुसून, “तुझ्या आईला आणि भावाला जीवे मारेन,” अशी भीती दाखवून अल्पवयीन मुलीवर बळजबरीने वारंवार लैंगिक अत्याचार केले. नराधमाच्या या सततच्या धमक्यांमुळे आणि भीतीपोटी चिमुकलीने हा प्रकार कोणालाही सांगितला नाही.

दरम्यान, अत्याचाराची मालिका तब्बल वर्षभर सुरू राहिल्यानंतर पीडित मुलगी गरोदर राहिल्याचे समोर आले. यानंतर पीडितेच्या आईने तिची विचारपूस केली असता, आरोपी विजय भिसे याने कृत्य केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
आता याप्रकरणी इंदापूर पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास महिला पोलीस उपनिरीक्षक एस. एन. सुरवसे करत आहेत.







