पुणे : मंत्रालयात लिपिक असल्याचे सांगून इंटरनेट पुरवठा करण्याचा परवाना मिळवून देण्याच्या आमिषाने एका महिलेची २१ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार शनिवारी (दि. २१) उघडकीस आला. या प्रकरणी एका दाम्पत्यासह तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुनील नामदेव गडकर, किरण सुनील गडकर (दोघेही रा. भिंताडेनगर, आंबेगाव) यांच्यासह एका महिलेविरुद्ध भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारदार महिला भारती विद्यापीठ भागात राहायला आहे. तक्रारदार महिला आणि त्यांच्या पतीची आरोपींशी एका व्यायामशाळेत ओळख झाली. त्यावेळी आरोपी सुनील गडकर याने आपण मंत्रालयात लिपिक असल्याची बतावणी करून मंत्रालयात उच्चपदस्थ अधिकाऱ्यांशी ओळख असल्याच्या थापा मारल्या. इंटरनेट पुरवठादारासाठी लागणारा परवाना (आयएसपी सी क्लास) मिळवून देतो, असे आमिष दाखवत आरोपी सुनील गडकर, त्याची पत्नी किरण आणि अन्य एका महिलेने तक्रारदाराकडून २१ लाख रुपये उकळले.