पिंपरी: महिलेला टेलिकॉम डिपार्टमेंटमधील प्रतिनिधी आणि पोलीस असल्याचे भासवून मनी लॉन्डरिंग झाल्याचे सांगितले. तसेच गुन्हा दाखल झाल्याचे सांगत अटकेची भीती दाखवून महिलेची १५ लाख २५ हजार रुपयांची फसवणूक केली. ही घटना २ ते १० डिसेंबर या ‘कालावधीत वाकड येथे घडली.
याप्रकरणी ३४ वर्षीय महिलेने बुधवारी (दि.१) वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार संबंधित मोबाईल क्रमांक धारक आणि पोलीस उपनिरीक्षक हेमराज कोळी नाव सांगणाऱ्या व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल केला. आरोपीने फिर्यादी महिलेला फोन करून तो टेलिकॉम डिपार्टमेंट ऑफ इंडियामधून बोलत असल्याचे खोटे सांगितले. फिर्यादी यांच्या नावाने सिमकार्ड खरेदी करून १५ ते २० लोकांना बेकायदेशीर मेसेज पाठवले आहेत. तसेच त्या सिमकार्डचा वापर मनी लॉन्डरिंगसाठी केला आहे.
त्याबाबत टिळकनगर पोलीस ठाणे, मुंबई, अंधेरी येथे गुन्हा दाखल असल्याचे सांगितले. पोलीस उपनिरीक्षक हेमराज कोळी असे नाव सांगणाऱ्या व्यक्तीने फिर्यादींच्या खात्यावरून २५ कोटींचे व्यवहार झाल्याचे खोटे सांगून फिर्यादीकडून १५ लाख २५ हजार रुपये ऑनलाईन पाठवण्यास सांगून फसवणूक केली.