वाकड: पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने गांजा विक्रीसाठी आलेल्या महिलेला अटक केली. दोन किलो 40 ग्रॅम वजनाचा गांजा महिलेकडून जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई रविवारी 21 जानेवारीला दुपारी वाकड येथे करण्यात आली. आरती अजय चव्हाण (वय 35, रा. बालेवाडी, पुणे) असे या प्रकरणी अटक केलेल्या महिलेचे नाव आहे. या प्रकरणी पोलीस अंमलदार प्रसाद जंगीलवाड यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाकड परिसरात एक महिला गांजा विक्रीसाठी आली असल्याची माहिती अमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून महिलेस ताब्यात घेतले.
या महिलेकडून दोन किलो चाळीस ग्रॅम वजनाचा दोन लाख चार हजार रुपये किमतीचा गांजा जप्त करण्यात आला. तिने हा गांजा परशुराम तुपेरे (रा. वाकड) याच्याकडून आणला असल्याचे तपासात समोर आले आहे. त्यामुळे पोलिसांनी परशुराम तुपेरे याच्या विरोधात देखील गुन्हा नोंदवला आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.