जामखेड : आईचे वृद्धापकाळाने निधन झाले. आईचे अंत्यविधी करुन घरी परतल्यावर तीन तासात लेकाचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना जामखेड तालुक्यातील खर्डा या गावात मंगळवारी घडली आहे.
इंदुबाई दत्तात्रय तंटक (वय-89) यांचे वृद्धापकाळाने सोमवारी रात्री निधन झाले. मंगळवारी त्यांचा अंत्यविधी करुन आल्यानंतर त्यांचा मुलगा किशोर तंटक (वय-61) यांना अचानक हृदयविकाराचा त्रास जाणवू लागला. त्यावेळी त्यांना तातडीने वैद्यकीय उपचारासाठी जामखेडला नेण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली.
इंदुबाई तंटक या खानावळ चालवत होत्या. खानावळ चालवून त्यांनी मुलांना शिक्षण दिले. त्यांचा मोठा मुलगा अशोक हा सेवानिवृत्त शिक्षक आहे. तर दुसरा मुलगा किशोर तटंक हा व्यापारी आहे. तर धाकटा मुलगा रवी हाही प्राध्यापक आहे. दरम्यान, आईच्या निधनाने दुसरा मुलगा किशोर तटंक याचा हृदयविकाराने मृत्यू झाला आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.