winter session : नागपूर : नागपूर येथे आजपासून राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरु झाले आहे. २० डिसेंबरपर्यंत हे अधिवेशन चालणार आहे. या अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये विविध मुद्द्यांवरून जोरदार खडाजंगी होण्याची शक्यता आहे. यात मराठा आरक्षण, धनगर आरक्षण, अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. कापूस सोयाबीनला भाव नाही. हे मुद्दे अग्रस्थानी आहेत.
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधक विविध मागण्यांचे फलक हातात घेऊन सरकारविरोधात घोषणाबाजी देत आहे. बळीराजा अवकाळीने त्रस्त, सरकार मात्र जाहिरातीत व्यस्त, सरकार सांगते दुष्काळ सदृश्य, कारण सरकार आहे अदृश्य, अशा घोषणा देण्यात आल्या. शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे अशी विरोधकांकडून मागणी करण्यात येत आहे. आमदरांनी गळ्यात संत्र्यांचा हार घातल्याचे पाहायला मिळाले. शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा व्हायला पाहिजे, अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली.
अवकाळी पावसामुळे राज्यात सव्वापाच लाख हेक्टर शेतीक्षेत्राचे नुकसान झाले आहे. त्यातील सव्वादोन लाख हेक्टर क्षेत्रातील नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. या नुकसानीच्या भरपाईसाठीची तरतूदही या पुरवणी मागण्यांत करण्यात आल्याचे समजते.