पुणे : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत दोन्ही ठाकरेंचा पराभव झाल्यानंतर आता आगामी होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी ठाकरे बंधू जोमाने कामाला लागले आहेत.महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसोबत युतीचे स्पष्ट संकेत दिले आहेत. त्यामुळे ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मनसेच्या राज ठाकरेंनी युतीसाठी घातलेल्या सादेला उद्धव ठाकरे यांनी प्रतिसाद देत माझ्याकडून कधी भांडण नव्हतीच,असं म्हणून युतीची दारू खुली केली असल्याचे संकेत दिले आहेत.मी सोबत येण्यास तयार आहे. माझ्याकडून सगळी भांडणं मिटली. पण माझी एक अट आहे. माझ्यासोबत जाऊन हित आहे की भाजपसोबत जाऊन हित आहे, ते आधी ठरवा, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. त्यामुळे दोन्ही ठाकरेंच्या विधानामुळे त्यांच्या एकत्र येण्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली आहे.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार मोर्चे बांधणी केली असताना ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याची शक्यता वर्तवली आहे. राज ठाकरे यांची साद आणि त्याला उद्धव ठाकरे यांनी दिलेला प्रतिसाद यामुळे ठाकरे बंधूंच्या मनोमिलनाच्या चर्चांना पुन्हा एकदा जोर चढला आहे. २०१७ मध्येही अशाच चर्चा सुरु होत्या. आता ठाकरेंची युती झाली तर ती कोणाला जड जाणार हे पाहणे देखील महत्त्वाचे ठरणार आहे.