मुंबई : राज्याची विधानसभा निवडणूक जाहीर झाली आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला असून प्रत्येक राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागला आहे. त्यात राज्यामध्ये महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना रंगणार आहे. युती-आघाडीची जागा वाटपावर बोलणी सुरु आहे. अशातच पुणे जिल्ह्यातील खडकवासला विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर लढणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. यावर रूपाली चाकणकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
त्या म्हणाल्या की, 2019 ला मी खडकवासला मतदारसंघाची मागणी केली होती. मी तिकडे काम करत होतेय, आता महायुती म्हणून आम्ही ज्येष्ठ पदाधिकारी, अजितदादांकडे खडकवासला मागणी केली. पण महायुती म्हणून तो मतदारसंघ भाजपकडे आहे. आम्ही महायुती धर्म पाळू आणि काम करू, असं रूपाली चाकणकर म्हणाल्या.
रुपाली चाकणकर यांची नुकतीच महिला आयोगाच्या अध्यक्षपदी पुन्हा नियुक्ती करण्यात आली आहे. येत्या 22 तारखेला चाकणकर यांचा कार्यकाळ संपणार होता मात्र तत्पूर्वीच आयोगाच्या अध्यक्षपदाची धुरा पुन्हा रुपाली चाकणकर यांच्याकडे सोपवण्यात आली. चाकणकर यांच्या नियुक्तीचं गॅझेट नुकतच प्रसिद्ध करण्यात आलं.