पुणे : पुणे लोकसभेकडून निवडणूक लढण्यासाठी मी इच्छूक आहे. राज ठाकरेंनी मला ती संधी दिली तर शंभर टक्के मनसेचा पहिला खासदार होण्याची भूमिका बजावेल, असा दावा वसंत मोरे यांनी केला आहे. आज नाशिक शहरात मनसेचा वर्धापन दिन साजरा होत आहे. त्यानिमित्ताने वसंत मोरे नाशिकला गेले आहे. या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमापूर्वी त्यांनी ही इच्छा एका वृत्त वाहिनीशी बोलताना व्यक्त केली आहे.
पुढे बोलताना म्हणाले, नाशिकमध्ये मनसेने सत्तेचं तोरण बांधलं होतं. आता लोकसभेच्या निवडणूका आहेत. याच पार्श्वभूमीवर नाशिकच्या मेळाव्याला मोठं महत्व प्राप्त झालं आहे, असं ते म्हणाले. लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे जो निर्णय घेतील तोच निर्णय अंतिम राहिल, असंही वसंत मोरे यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केलं आहे.
कुणासाठी कितीबी करा वेळ आली की फणा काढतातच
शर्मिला ठाकरे यांनी पुण्यात बोलताना साईनाथ बाबरांना मोठी संधी देण्याबद्दल सुतोवाच केले होते. यानंतर पुण्यातील मनसे नेते वसंत मोरे यांनी सूचक व्हाट्सॲप स्टेट्स ठेवल्यानंतर पुन्हा एकदा मनसेच्या राजकीय वर्तुळात चर्चा रंगली होती. शर्मिला ठाकरे यांच्या दौऱ्यानंतर काही तासांमध्येच त्यांनी स्टेट्स ठेवत राजकीय खळबळ उडवून दिली होती.
“कुणासाठी कितीबी करा वेळ आली की फणा काढतातच पण मी बी पक्का गारुडी आहे, योग्य वेळी सगळी गाणी वाजवणार.” त्यामुळे वसंत मोरे यांनी नेमका कोणाला संदेश दिला आहे याची चर्चा रंगली. त्यानंतर थेट ते शरद पवारासोबत दिसले आणि अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. मात्र त्यानंतर आता त्यांनी थेट मी इच्छूक असल्याचं सांगून टाकलं आहे. दरम्यान, मनसेकडून आगामी निवडणुका लढवण्याची घोषणा करण्याची शक्यता आहे. तसेच पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना राज ठाकरे कोणती नवी राजकीय भूमिका घेतात, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.