पुणे : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषण सुरु केल्याने त्यांची तब्येत खालावतू चालली आहे. त्यांनी उपचार घेण्यास सुरुवात केली असली तरी प्रकृतीत फारशी सुधारणा झालेली नाही. या परिस्थितीमुळे राज्यभरातील मराठा समाज प्रचंड आक्रमक झाला आहे. यातून मार्ग काढण्यासाठी छत्रपती संभाजीनगर येथील स्मार्ट सिटी कार्यालयात सरकारच्या शिष्टमंडळाची तातडीची उच्चस्तरीय बैठक आयोजित करण्यात आली आहे.

या महत्त्वपूर्ण बैठकीमध्ये माजी न्यायमूर्ती शिंदे समितीचे सदस्य, मराठा आरक्षणाचे तज्ज्ञ आणि महत्त्वाचे शासकीय अधिकारी सहभागी झाले आहेत. हैदराबाद गॅझेटनुसार आढळलेल्या कुणबी नोंदी आणि कुणबी प्रमाणपत्र मिळवताना नागरिकांना येणाऱ्या तांत्रिक अडचणींवर या बैठकीत सविस्तर चर्चा केली जाणार आहे.यातून जरांगेंच्या प्रश्नांवर तोडगा निघणार का हें पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

यापूर्वी उद्योगमंत्री उदय सामंत आणि भाजप आमदार प्रसाद लाड यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये भेट देऊन आढावा घेतला होता. या बैठकीतील निर्णयांवरच जरांगे पाटील यांच्या उपोषणाची पुढील दिशा आणि मराठा समाजाचे समाधान अवलंबून असणार आहे. त्यामुळे या घडामोडींकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले आहे.
आज खबरदारीचा उपाय म्हणून या बैठकीच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलिस फाटा तैनात करण्यात आला असून संपूर्ण परिसराला छावणीचे स्वरूप आले आहे.

दरम्यान नांदेड-नागपूर महामार्गावर हदगाव तालुक्यातील बरडशेवाळा येथे आंदोलकांनी रस्ता अडवून राज्य सरकारविरोधात तीव्र निदर्शने केली. आंदोलनादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी ठिकठिकाणी कडक बंदोबस्त तैनात केला आहे.







