मंचर (पुणे): अवसरी बुद्रुक (ता. आंबेगाव) येथे रानडुकरांच्या कळपाने चंद्रकांत गुणगे या शेतकऱ्याचे सुमारे दीड एकर कांद्याच्या क्षेत्राचे नुकसान केले आहे. यात शेतकऱ्यांचे हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे. वनविभागाने याची दखल घेऊन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
अवसरी बुद्रुक परिसरातील शेटे, गुणगे मळा परिसर हा पूर्णपणे एका बाजूने डोंगराळ भाग असल्याने या परिसरात नेहमीच वन्य प्राणी आढळत आहेत. बिबट्याच्या भितीनंतर आता शेतकऱ्यांनी रानडुकराच्या कळपामार्फत वारंवार होणाऱ्या शेती पिकाच्या नुकसानीचा धसकाच घेतला आहे. अनेक उपाय करून देखील रानडुकराचे कळप शेतात उभ्या असणाऱ्या पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान करत आहेत.
डिसेंबरच्या पहिल्याच आठवड्यात हनुमंत वाघ यांच्या विलायती गवताचे संपूर्णपणे रानडुकरांच्या कळपाने नुकसान केले होते. त्याचबरोबर इतरही शेतकऱ्यांचे थोडेफार नुकसान झाले होते. आता एका महिन्यानंतर चंद्रकांत गुणगे या शेतकऱ्याच्या एकाच ठिकाणी वेगवेगळ्या क्षेत्रात असणाऱ्या एकूण दीड एकर क्षेत्रामधील सुमारे सव्वा ते दीड महिन्याच्या कांदा या पिकाचे नुकसान केल्याने शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. याबाबत त्यांनी ही या घटनेची कल्पना वनविभागाला दिली असून वनरक्षक सीएस शिवचरण यांनी पाहणी करून पंचनामा केला आहे. याबाबत वनपाल प्रदीप कासारे म्हणाले संबंधित शेतकऱ्यांनी योग्य प्रकारे अर्ज करून दिल्यास त्यांना शासनाकडून नुकसान भरपाई मिळू शकते.
….तर आम्हाला परवानगी द्या !
शेतकऱ्यांच्या शेतीमालावर वारंवार होणाऱ्या रानडुकराच्या हल्ल्यामुळे शेती पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. शेतकऱ्यांना त्यामुळे आर्थिक फटका बसत आहे. वनविभागाने या रानडुकरांचा बंदोबस्त करावा अथवा आम्हाला त्यांचा बंदोबस्त करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.