अहमदाबाद : लग्नासाठी अनेक कारनामे करून लग्न जमवल्याच्या घटना आपल्या डोळ्यासमोरून जात असतात किंवा आपण त्या ऐकलेल्या तरी असतात. अनेक लग्नाच्याबाबत पती किंवा पत्नीकडून काही तरी फसवणूक केलेली असते आणि नंतर ती उघड होऊन जे व्हायचं ते होत असत. अहमदाबाद अशीच एक बाब समोर आली आहे. पतीने चक्क पत्नी आणि त्यांच्या कुटुंबीयांवर गुन्हा दाखल केला. लग्नाच्या वेळी मुलीचं वय कमी दाखवलं, पण गरोदर राहत नसल्याने चाचणी केल्यानंतर मात्र हा बनाव समोर आला आहे. पत्नी ही पतीपेक्षा तब्बल आठ वर्षांनी मोठी असल्याचं आता उघड झालं आहे. पतीने या प्रकरणी पत्नी आणि तिच्या कुटुंबीयावर गुन्हा दाखल केला आहे.
अहमदाबादच्या सरखेज भागात राहणाऱ्या एका महिलेला वर्षभरापासून गर्भधारणा होत नव्हती. तेव्हा तिचा 34 वर्षीय पती तिला डॉक्टरांकडे घेऊन गेला. त्यावेळी केलेल्या वैद्यकीय अहवालात ती महिला 40 वर्षांची असल्याचे समोर आलं. वैद्यकीय मदतीशिवाय ती आई होऊ शकत नसल्याचं डॉक्टरांनी सांगितलं.
कायदेशीर कारवाईची मागणी
सोनोग्राफी अहवालातील खुलासा झाल्यानंतर पतीला धक्का बसला आहे. लग्नाच्या वेळी पत्नीचे वय 32 वर्षे असल्याचं सांगण्यात आलं होतं. मात्र सोनोग्राफीमध्ये तिचे वय 40 वर्षांपेक्षा जास्त असल्याचे समोर आले. पतीने अहमदाबाद पोलिसांकडे तक्रार दाखल करून पत्नीचे वय लपविल्याबद्दल कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे. पतीच्या तक्रारीवरून पोलिसांनी पत्नी, तिचे वडील आणि तिच्या नातेवाईकांसह आठ जणांविरुद्ध फसवणूक, गुन्हेगारी कट आणि धमकावण्याशी संबंधित अनेक कलमांतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
नेमकी घटना काय आहे?
या घटनेतील जोडप्याची मे 2023 मध्ये एकमेकांशी ओळख झाली होती. लग्नासाठी देण्यात आलेल्या बायोडेटामध्ये त्या मुलीचं वय हे 18 मे 1991 असं नमूद होतं. त्यामुळे तिचं वय हे मुलापेक्षा 18 महिन्यांनी लहान असल्याचं दाखवण्यात आलं होतं. पण मुलाकडच्या लोकांनी वारंवार मागणी करूनही मुलीच्या बाजूच्यांनी तिचा शाळा सोडल्याचा दाखला किंवा इतर शैक्षणिक पुरावे दिले नव्हते. नंतर यासंबंधित सर्व दाखले हे बनावट पद्धतीने काढण्यात आले आणि पतीला देण्यात आल्याचं सांगण्यात येतं आहे.
पतीच्या म्हणण्यानुसार, अनेक महिने प्रयत्न करूनही गर्भधारणेचे प्रयत्न अयशस्वी ठरले होते. त्यामुळे घरी कुणालाही न सांगता त्याने पत्नी आणि मेहुणीसह जुहापुरा येथील डॉक्टरांकडून स्वत:ची तपासणी करून घेतली. पत्नीने हा अहवाल पतीला सांगितला नाही. यानंतर पतीने सप्टेंबर 2023 मध्ये पुन्हा पालडी येथील स्त्रीरोगतज्ञाचा सल्ला घेतला. त्यावेळच्या सोनोग्राफी अहवालात पत्नीचे वय 40 ते 42 वर्षांच्या आसपास असल्याचे समोर आले. पत्नी नैसर्गिकरित्या गर्भधारणा करू शकणार नाही असे डॉक्टरांनी त्यावेळी सांगितले. यानंतर पतीने जुहापुराच्या डॉक्टरांकडून रिपोर्टही मिळवला. दोघांचे निष्कर्ष सारखेच असल्याचे त्यामध्ये दिसून आले.
अखेर पत्नीविरोधात गुन्हा दाखल
या प्रकरणात पत्नीचे वय हे पतीपेक्षा आठ वर्षांनी जास्त असल्याचं उघड झाल्यामुळे लग्नावेळी खोटं वय दाखवून आपली फसवणूक करण्यात आल्याचा आरोप पतीने केला. त्यानंतर पतीने पत्नी आणि तिच्या कुटुंबीयांविरोधात फसवणूक, धमकी देणे आणि गुन्हेगारी कट रचण्याचा आरोप करत गुन्हा दाखल केला आहे. पतीने अहमदाबाद पोलिसांकडे तक्रार दाखल करून पत्नीचे वय लपविल्याबद्दल कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे.