मुंबई : मुंबई शहरातील कांजूरमार्ग येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. दारू पिण्यास विरोध केल्याने पत्नीची निर्घृण हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे. या घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. दीपा यादव असं खून झालेल्या महिलेचे नाव आहे. तर राजेश यादव असं खून करणाऱ्या आरोपीचं नाव आहे. दरम्यान, सोशल मीडियावर दोघांची ओळख झाली. त्यानंतर दोघांमध्ये प्रेम झाले आणि सहा महिन्यांपूर्वी दोघांनी लग्न केले होते.
मिळालेल्या अधिक माहितीनुसार, मंगळवारी कांगूर मार्गावर असलेल्या झोपडपट्टीतून दुर्गंधी येत असल्याने पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घराचा दरवाजा तोडला आणि महिला बेशुद्द बेडशीटमध्ये गुंडाळलेल्या अवस्थेत सापडली. महिलेचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. या घटनेनंतर हल्लेखोर फरार झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी आरोपी राजेशची चौकशी सुरु केली असून राजेश फरार असल्याने त्यानेच खून केल्याचा संशय पोलिसांना होता.
त्यानंतर त्याचा फोन नंबरवरून लोकेशन ट्रेस करण्यात आलं. त्यावरून उत्तर प्रदेशाच्या गाझीपूर येथून त्याला ताब्यात घेण्यात आलं आहे. पोलिसांनी राजेशची चौकशी केली असता त्याने पत्नीची हत्या केल्याचे कबुल केले. आरोपीवर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून दारू पिण्यावरून भांडण आणि विरोध केल्याने तिची हत्या करण्यात आली असल्याच राजेशने कबुल केलं.