बीड : चारित्र्यावर संशय घेऊन पत्नीसह दोन मुलांचा खून करणाऱ्यास प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश आनंद एल. यावलकर यांनी फाशीची शिक्षा सुनावली आहे. ही घटना २४ मे २०२० रोजी बीड शहरातील तकवा कॉलनी भागात घडली होती. संतोष जयदत्त कोकणे (रा. तकवा काॅलनी, शुक्रवार पेठ, बीड) असे आराेपीचे नाव आहे. तर संगीता संतोष कोकणे (वय ३५), सिद्धेश संतोष कोकणे (वय १०) व कल्पेश संतोष कोकणे (वय ८) अशी मयतांची नावे आहेत.
शहरातील तकवा कॉलनी भागात राहणाऱ्या संतोषने २४ मे २०२० रोजी पत्नी संगीताच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिच्यासह मुलगा सिद्धेश कोकणे यांचा डोक्यात बॅट मारुन तर तसेच दगडाने मारुन खून केला होता. तसेच कल्पेश कोकणे यास डोक्यात बॅट मारुन बेशुद्ध करून पाण्याच्या बॅरलमध्ये पाण्यात बुडवून जीवे मारून खून केला होता. या घटनेने संपूर्ण जिल्हा हादरला होता. याप्रकरणी आरोपीच्या भावाच्या फिर्यादीवरून पेठबीड पोलिस ठाण्यात संतोष कोकणे याच्या याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या प्रकरणात सरकार पक्षाकडून पंधरा साक्षीदार तपासण्यात आले. तसेच अॅड. वकील भागवत एस. राख यांचा युक्तीवाद ग्राह्य धरून आरोपी सोष कोकणे यास फाशीची शिक्षा सुनावली. या प्रकरणी सरकार पक्षाकडून सहायक सरकारी वकील अॅड. भागवत एस. राख यांनी काम पाहिले व त्यांना जिल्हा शासकीय अभियोक्ता यांनी मार्गदर्शन केले त्यांना पैरवी अधिकारी म्हणून ए.एस.आय माधव नागमवाड, बी.बी. जायभाय यांनी मदत केली.
या प्रकरणात आरोपीविरुद्ध गुन्हा सिद्ध करण्यासाठी सरकार पक्षातर्फे एकूण पंधरा साक्षीदार तपासण्यात आले. यामध्ये संगीताचे ज्या पुरुषाबरोबर अनैतिक संबंध असल्याचा संशय होता, त्याची साक्ष महत्त्वाची ठरली. तसेच संतोषच्या भावाचा जबाब, इतर साक्षीदारांचे जबाब, परिस्थितीजन्य पुरावा, वैद्यकीय पुरावा, न्यायवैद्यकीय प्रयोगशाळा यांचा अहवाल यांचे अवलोकन आणि सहा. सरकारी वकील भागवत एस. राख यांचा युक्तिवाद ग्राह्य धरला. सदरचे प्रकरण हे दुर्मीळातील दुर्मीळ असून आरोपीस फाशी देणे इतपत गंभीर आहे, हा युक्तिवाद ग्राह्य धरून संतोष कोकणे याला फाशीची शिक्षा सुनावली आहे.